Girija Oak : १५ वर्षांचा संसार, नवऱ्यासाठी गिरीजा ओकची खास पोस्ट; ‘तुझ्यासोबत आयुष्य जगायला मिळतंय…’
Girija Oak : गिरीजा ओकच्या पतीचं नाव सुहृद गोडबोले आहे. सुहृद हे मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. 'पुणे ५२' आणि 'बाजी' यांसारख्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीशी ते संबंधित होते.

Girija Oak : मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक आपल्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती सतत सक्रिय असून आपल्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच गिरीजाने पतीसोबतचा एक सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोसोबत तिने दिलेल्या खास कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
गिरीजाने पतीसोबतच्या फोटोला कॅप्शन देताना लिहिलं, ‘हॅपी १५ वर्षे पार्टनर… मला खूप आनंद आहे की हे आयुष्य मला तुझ्यासोबत जगायला मिळत आहे.’ तिच्या या प्रेमळ पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला असून दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, गिरीजाचा पती नेमका कोण आहे आणि तो काय करतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कोण आहेत गिरीजा ओकचे पती सुहृद गोडबोले?
गिरीजा ओकच्या पतीचं नाव सुहृद गोडबोले आहे. सुहृद हे मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. ‘पुणे ५२’ आणि ‘बाजी’ यांसारख्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीशी ते संबंधित होते. याशिवाय ‘जून’ चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता, तसेच अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं होतं.
View this post on Instagram
चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनासोबतच सुहृद यांनी गीतलेखन आणि इव्हेंट डिझाइनिंग अशा विविध क्षेत्रांतही काम केलं आहे. त्यामुळे ते केवळ गिरीजा ओकचे पती म्हणूनच नव्हे, तर मनोरंजनविश्वातील स्वतःची वेगळी ओळख असलेले व्यक्तिमत्त्व म्हणूनही ओळखले जातात.
अशी सुरू झाली गिरीजा आणि सुहृद यांची लव्हस्टोरी!
गिरीजा ओक आणि सुहृद गोडबोले यांची पहिली भेट २००८ मध्ये झाली होती. प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात दोघांची ओळख झाली. त्यानंतर एका प्रोजेक्टच्या निमित्ताने त्यांचा पुन्हा संपर्क आला. हळूहळू दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं.
काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर गिरीजा आणि सुहृद यांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांचा सुखाचा संसार सुरू आहे. आता लग्नाच्या १५ वर्षांच्या सहप्रवासानिमित्त गिरीजाने शेअर केलेल्या या खास पोस्टमुळे त्यांच्या प्रेमाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीच्या या खास पोस्टवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
US-Iran War: इराणच्या गुप्त हल्ल्याची भीती? ; अमेरिकेचे अर्थमंत्री मायदेशी परतताच बंकरमध्ये!





