Satara | खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील गावांसाठी १५ कोटी 85 लाख निधी

खंडाळा, (प्रतिनिधी) – कोयना धरण प्रकल्पाच्या महाबळेश्वर तालुक्यातील काही गावे आणि खंडाळा तालुक्यातील वीर धरण प्रकल्पाच्या पूनर्वसित तीन गावांच्या मुलभूत सुविधांसाठी सुमारे १५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
आ. पाटील म्हणाले, या दोन्ही धरणाच्या पूनर्वसित गावांचे विविध प्रश्न प्रलंबित होते. या गावांना अठरा नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी नागरिकांची सातत्याने मागणी होती.
यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केल्याने खंडाळा तालुक्यातील वीर धरण पुनर्वसित तोंडल, लोणी, भोळी या गावातील विविध कामांसाठी १३ कोटी ४८ लाख रुपये तर कोयना धरण पुनर्वसित महाबळेश्वर तालुक्यातील साळोशी,
रेणोशी, खरोशी, झांजवड, मोरणी, उचाट, आरव, शिंदी, गावढोशी, दुधगाव या गावांसाठी २ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
या योजनेतून खंडाळा तालुक्यातील तोंडल येथील रस्ते खडीकरण करणे १ कोटी ३ लक्ष , आर. सी. सी. गटर बांधणे १ कोटी ८० लक्ष , स्मशानभूमी बांधणे २५ लक्ष, शाळेस संरक्षक भिंत बांधणे २९ लक्ष, समाजमंदिर बांधणे २५ लक्ष , अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे ७७ लक्ष, लोणी येथील अंतर्गत रस्ते खडीकरण करणे १ कोटी २० लक्ष , गटारे बांधणे २ कोटी लक्ष ,
बस थांबा बांधणे ५ लक्ष , शाळेस संरक्षक भिंत बांधणे २२ लक्ष , समाजमंदीर बांधणे २५ लक्ष, अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे ९० लक्ष, भोळी येथील अंतर्गत रस्ते खडीकरण करणे १ कोटी २७ लक्ष , गटारे बांधणे १ कोटी ७७ लक्ष , बस थांबा बांधणे ५ लक्ष , समाजमंदीर बांधणे २५ लक्ष, अंतर्गत रस्ता डांबरीकरण करणे ९६ लक्ष असा एकूण १३ कोटी ४८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील साळोशी येथील शाळेस संरक्षक भिंत बांधणे १५ लक्ष, अंतर्गत रस्ता ७० लक्ष , रेणोशी येथील अंतर्गत रस्ता तयार करणे १९ लक्ष, खरोशी येथील अंतर्गत रस्ता तयार करणे १५ लक्ष, झांजवड येथील रस्ता तयार करणे ५ लक्ष, उचाट येथील स्मशानभूमी शेड बांधणे ५ लक्ष,
मोरणी येथील स्मशानभूमी शेड बांधणे ५ लक्ष, आरव येथील ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे३८ लक्ष, शिंदी येथील ग्रामपंचायत कार्यालय इमारत बांधणे ३७ लक्ष, गावढोशी येथील शाळेस संरक्षक भिंत बांधणे १४ लक्ष, दुधगाव येथील शाळेस संरक्षक भिंत बांधणे ९ लक्ष असा २ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
उर्वरित समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील
कोयना आणि वीर धरणाच्या पुनर्वसित गावांचे विविध प्रश्न सुटावेत यासाठी गावकऱ्यांचा आग्रह होता. त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी शासनाकडे आणि संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने काही कामांसाठी निधी उपलब्ध झाल्याने लोकांना सुविधा मिळणार आहेत.
पुनर्वसित गावांच्या उर्वरित समस्या सोडवण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे आ. मकरंद पाटील यांनी यावेळी सगितले.





