Ranchi accident: चालक फोनवर बोलत असल्याने अपघात, बस उलटून 15 शाळकरी मुले जखमी

रांची – झारखंडच्या रांचीमध्ये शनिवारी सकाळी शाळेची एक बस उलटल्याने झालेल्या अपघातात पंधरा शाळकरी मुले जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मंदार येथील सेंट मारिया शाळेपासून १०० मीटर अंतरावर ही बस एका वळणावर उलटली, त्यावेळी बसमध्ये एकूण ३० विद्यार्थी होते. त्यातील पंधरा मुले जखमी झाली असून त्यांना जवळच्या मिशन हॉस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.
एका मुलाच्या डोक्याला दुखापत झाली आहे, त्याचे सीटी स्कॅन केले जात आहे. तथापी अन्य जखमी मुलांची प्रकृती ठीक असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अपघात झाला तेव्हा बस वेगात होती आणि चालक फोनवर बोलत असल्याचा आरोप मुलाच्या पालकांनी केला आहे. आज बस ४५ मिनिटे उशिरा होती. त्या वेळेची भरपाई करण्यासाठी, ड्रायव्हर वेगात होता आणि कोणाशी तरी फोनवर बोलत होता,असा आरोप पालकांनी केला आहे. अपघातानंतर बस चालक पळून गेला, त्याचा शोध सुरू आहे.





