प्रभात वृत्तसेवा पुणे – वेगाने वाढणाऱ्या पुण्यातून विमान प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मात्र, लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानांना पक्षी धडकणे, धावपट्टीवर प्राणी येणे तसेच अन्य कारणांमुळे अडथळा येण्याच्या घटनाही वाढत आहेत. गेल्या साडेपाच वर्षांत विमानांना पक्षी (बर्ड हिट) धडकल्याच्या १४५ घटना घडल्या असून त्यात गेल्या तीन वर्षांपासून ही संख्या लक्षणीय वाढली आहे. यामुळे प्रवाशांची आणि हवाई सेवेची सुरक्षा धोक्यात येऊ शकते.विमानांना पक्षी धडकण्याच्या (बर्ड हिट) घटनांमध्ये देशात पुणे विमानतळ पहिल्या दहामध्ये आहे. गेल्या काही महिन्यांपासून विमानतळ परिसरात बिबट्यांचा वावर, धावपट्टीजवळ कुत्रे, मोर येण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या परिसरात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार ‘बर्ड हिट’च्या सर्वाधिक घटना दिल्लीत ६९५, मुंबईत ४०७, अहमदाबादला ३३७ तर बंगळुरू येथे ३४३ आणि हैदराबादला २०७ घटना घडल्या आहेत. या ठिकाणांहून विमान उड्डाणांची संख्याही मोठी आहे. पुण्यात तुलनेने उड्डाणांची संख्या कमी असली तरी ‘बर्ड हिट’ च्या घटना अधिक आहेत. “विमानतळ परिसराबाहेर वाढत्या नागरीकीकरणामुळे घनकचरा व्यवस्थापनाच्या समस्या गंभीर होत आहेत. हे घटक विमानांच्या सुरक्षित, कार्यक्षम संचालनावर प्रतिकूल परिणाम घडवू शकतात. या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक उपाययोजनांची गरज आहे.” – धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ काय करायला हवे? पक्षी, भटकी कुत्री आणि अन्य प्राण्यांचा वावर रोखण्यासाठी अभेद्य सुरक्षाभिंती, सेन्सर यंत्रणा आणि नियमित गस्तीची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी. विमानतळाच्या १० किलोमीटर परिघातील विकास नियोजन सुसंगत, नियमनबद्ध व संरक्षित ठेवण्यासाठी काही वर्षांपूर्वी कमी केलेले ‘रेड झोन’चे क्षेत्र वाढवण्याचा विचार करायला हवा. झोनिंग नियमांचे काटेकोर पालन गरजेचे आहे.