पक्ष्यांच्या 14 प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर

पश्चिम घाटातील दुर्मिळ पक्ष्यांचाही समावेश; संवर्धनासाठी ठोस उपायांची गरज
पुणे – राज्यातील पाणथळ आणि गवताळ प्रदेशांवर होणाऱ्या अतिक्रमणांमुळे या प्रदेशांचे अस्तित्व संपत आहे. त्यामुळेच या प्रदेशांवर आधारित राज्यातील 14 पक्ष्यांच्या प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये पश्चिम घाटातील स्थानिक प्रजातीतील दुर्मिळ पक्ष्यांचाही समावेश आहे. या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ठोस उपायांची गरज पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयातर्फे नुकताच “भारतीय पक्ष्यांची सद्य:स्थिती’ अहवाल प्रकाशित झाला. यात भारतातील सुमारे 1,300 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजीतींचा अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालात भारतातील तब्बल 101 पक्ष्यांच्या प्रजाती या अतिधोकादायक अवस्थेत आहेत, तर 345 प्रजाती धोकादायक अवस्थेत असल्याचे नमूद केले आहे. देशभरातील तब्बल 1500 हून अधिक नागरिकांनी ईबर्डच्या सहाय्याने केलेल्या नोंदी आणि पूर्वीच्या उपलब्ध नोंदीच्या आधारावर हा अभ्यास केला आहे.
अहवालात महाराष्ट्रातील पक्ष्यांच्या सद्य:स्थितीबाबतही भाष्य केले आहे. राज्यातील 14 पक्ष्यांच्या प्रजाती या अतिधोकादायक अवस्थेत आहेत. तर आणखी काही प्रजातीदेखील धोकादायक अवस्थेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे पश्चिम घाटातील 45 स्थानिक प्रजातींपैकी काही प्रजातीदेखील अतिधोकादायक अवस्थेत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
यामध्ये सर्वाधिक धोकादायक स्थितीत असलेला पक्षी म्हणजे माळढोक म्हणजेच ग्रेट इंडियन बस्टर्ड प्रकारातील पक्षी. राज्यात माळढोकाच्या दोन प्रजाती आढळतात यामध्ये माळढोक आणि तणमोर या दोन पक्ष्यांचा समावेश होतो. महत्त्वाचे म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाकडून या पक्ष्यांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्यापही यामध्ये यश मिळालेले नाही.
पक्षी संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना
पक्ष्यांच्या अधिवसाचे संरक्षण
शिकार, तस्करी रोखण्यासाठी आवश्यक कारवाई
नियमित अभ्यास
जलस्रोतांचे प्रदूषण रोखणे
कीटकनाशकांच्या वापरावर निर्बंध
राज्यातील अतिधोकादायक अवस्थेतील पक्षी
रूंद शेपटीचा गवती वटवट्या रानपिंगळा पर्णवटवट्या मोठा जलरंक निलगिरी रानपारवा हिरवी मुनिया चोटी लालसरी
तुरेवाला सर्पगरूड छोटा पाणकावळा सापमार गरूड स्मॉल मिनिवेट.





