नगर -शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला हर्बल प्रॉडक्ट खरेदीच्या बहाण्याने नायजेरीयन व्यक्तीने ऑनलाइन 14 लाख 17 हजार 500 रुपयाना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 13 जुलै 2020 ते 2 नोव्हेंबर 2020 दरम्यान घडला.
याप्रकरणी गुरुवारी (दि.27) हॉटेल व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील एका उच्चशिक्षित व्यक्तीला अशाच एका भामट्याने 70 लाख रुपयांना ऑनलाइन गंडा घातल्याची बाब उघडकीस आली होती. याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका नायजेरीयन व्यक्तीला अटकही केली होती. हे प्रकरणा ताजे असतानाच पुन्हा असाच प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाची सोशल मीडियावर एका व्यक्तीसोबत मैत्री झाली. भारतातील हर्बल प्रोडक्ट कंपनीकडूनआयुर्वेदिक औषधांचा कच्चा माल खरेदी करण्याचा बहाणा करून त्याने विविध बॅंकांच्या पाच खात्यांची खोटी माहिती हॉटेल व्यावसायिकाला दिली. त्यानंतर संबंधित हॉटेल व्यावसायिकाचा विश्वास बसल्याचे पाहून खरेदी प्रक्रिया सुरू केल्याचे भासवत विविध कारणांसाठी पैसे उकळण्यास सुरवात केली.
बनावट ई-मेल अकाउंटवरून बनावट कागदपत्रे पाठवून आरोपीने या हॉटेल व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला. तसेच विविध कारणांसाठी 14 लाख 17 हजार 500 रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे संबंधित हॉटेल व्यावसायिकाच्या लक्षात आल्याने त्याने नगर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे. नगर सायबर पोलिसांनी तांत्रिक पातळीवर तपास सुरू केला असून, बॅंक खात्यांबाबत माहिती घेत आहेत. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक साळवे करीत आहेत.