Pune : वीजबिल थकबाकीमुक्ती “अभय’ योजनेला उरले १४ दिवस

पुणे : वीजबिल थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित (पर्मनंट डिस्कनेक्टेड) असलेल्या ग्राहकांना थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी महावितरण अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे. या योजनेला केवळ १४ दिवस उरले असून आतापर्यंत पुणे प्रादेशिक विभागातील २३ हजार ७७९ लघु व उच्चदाब थकबाकीदार ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यातील २० हजार ५४६ वीजग्राहकांनी ३० कोटी २० लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. यात पुणे जिल्ह्यात ८६२६ ग्राहकांनी १८ कोटी ७६ लाख रुपयांचा समावेश आहे.
थकीत वीजबिलांमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने अभय योजना सुरु केली आहे. यामध्ये केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होणार आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना आणखी ५ टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरुवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे. महावितरण अभय योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबरला संपणार आहे.
अभय योजनेमध्ये पुणे प्रादेशिक विभागात आतापर्यंत सहभागी २० हजार ५४६ वीजग्राहकांनी ३० कोटी २० लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. यात पुणे जिल्ह्यात ८६२६ ग्राहकांनी १८ कोटी ७६ लाख, सातारा जिल्ह्यात ९९४ ग्राहकांनी १ कोटी ५१ लाख, सोलापूर जिल्ह्यात ३३२८ ग्राहकांनी २ कोटी ८८ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ४०४३ ग्राहकांनी ४ कोटी ७४ लाख आणि सांगली जिल्ह्यातील ३५५५ ग्राहकांनी २ कोटी ३१ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.





