14 कोटींची फसवणूक: तळबीड पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या, चौघे फरार

यशवंतनगर – तब्बल 14 कोटी 11 लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात तळबीड पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे, तर चार जण फरार झाले आहेत. या प्रकरणात तासवडे (ता. कराड) एमआयडीसीतील वरुणेश्वर ऑरगॅनिक कंपनीचा मालक प्रांजित पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
फसवणुकीचा डाव –
मुंबईतील अंधेरी येथील क्लियरसिंथ लॅब लिमिटेड ही औषध निर्मिती क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे. या कंपनीचे कार्यकारी संचालक पी. बी. गिरासे यांनी ग्रामीण भागात शाखा उभारून तरुणांना रोजगार देण्याच्या उद्देशाने तासवडे आणि सातारा एमआयडीसी परिसरात शोधाशोध केली. यावेळी प्रांजित पाटील यांच्याशी त्यांची चर्चा झाली. सुरुवातीला 10 कोटी रुपयांत वरुणेश्वर ऑरगॅनिक कंपनी विक्रीचा एमओयू झाला. मात्र, जानेवारी 2024 ते मार्च 2025 या कालावधीत प्रांजित पाटील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी 14 कोटी 11 लाख रुपये उकळले. तरीही बीटीए करार नोंदवण्यास नकार देत भूखंड हस्तांतर केला नाही. संशयितांनी करारावरील स्वाक्षऱ्या आपल्या नसल्याचा दावा करत फसवणूक केल्याचं उघड झालं.
अटक आणि तपासाची दिशा-
या फसवणुकीचा गुन्हा नोंदवल्यानंतर तळबीड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रांजित पाटील याला अटक केली. इतर संशयित – प्रियंका पाटील, पंजाबराव पाटील, अमरजित पाटील (सर्व रा. विठ्ठल संकुल सोसायटी, कराड) आणि सुनील वामनराव ढोकणे (रा. आटोपिया बिल्डिंग, मोशी, पुणे) हे फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी दोन तपास पथकं रवाना करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले तपास करत आहेत.
पोलिसांचा तपास तीव्र –
या प्रकरणात पोलिसांनी जलद कारवाई करत एकाला ताब्यात घेतलं असलं तरी फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रं वेगाने फिरत आहेत. या फसवणुकीमुळे ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीच्या स्वप्नाला मोठा धक्का बसला आहे.





