“तुरुंगात डांबले तरी उद्धव ठाकरेंसोबत राहणार, हे सर्व षड़यंत्र मुख्यमंत्री…”; एसीबीच्या नोटिशीनंतर राजन साळवी यांची प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेनेचे ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावल्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण ढवळून निघालेआहे. याच पार्श्वभूमीवर एसीबीच्या नोटिशीनंतर आमदार राजन साळवी यांनी आज पत्रकार परिषद घेत तुरुंगात डांबले तरी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचे म्हटले. तसेच त्यांनी या सर्व प्रकरणाच्या मागे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असल्याचा आरोपदेखील यावेळी केला.
आमदार राजन साळवी यांनी आज पत्रकार परिषद घेत एसीबीकडून आलेल्या नोटिशीवर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. आमदार साळवी यांनी, राजकीय उलथापालथीनंतर मी निष्ठावंत राहिलो. मी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. त्यामुळेच मला ACB ची नोटीस आली आहे. यंत्रणाचा वापर करत नोटीस दिल्या जात असल्याचा आरोप साळवी यांनी केला.
तसेच ज्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ताचा आरोप ते भाजपमध्ये जात आहेत. मलादेखील तुम्हाला तुरुंगात डांबणार अशा धमक्या देण्यात आल्या असल्याचा दावा साळवी यांनी केला. आपण एसीबीच्या नोटिशीला घाबरत नसून चौकशीला सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले. नोटीस पाठवण्याइतके माझ्याकडे कोणते घबाड आहे, हाच प्रश्न मला पडला असल्याचेही साळवी यांनी म्हटले.
राजन साळवी हे शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. आमदार साळवी यांनी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत चर्चा सुरू होत्या. आज राजन साळवी यांनी या मुद्यावर भाष्य करताना आपण तुरुंगात गेलो तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणार असल्याचे म्हटले. मला स्वकीयांचा, पक्षातील कोणत्याही व्यक्तीचा त्रास नाही. उद्धव ठाकरे यांनी आपण पाठिशी असल्याचे आश्वासन दिले असल्याचे साळवी यांनी म्हटले.
मला 15 दिवसांची मुदत द्या अशी मागणी एसीबीकडे केली असल्याचे आमदार राजन साळवी यांनी म्हटले. आमदार साळवी यांना एसीबीने चौकशीसाठी अलिबाग येथे सोमवारी, 4 डिसेंबर रोजी बोलावले आहे. या दरम्यान, एसीबीने मला अटक केली तरी चालेल असेही त्यांनी म्हटले. मी कोणत्याही दबावाला बळी पडणार नसून मी मरेपर्यंत तुरुंगात राहीन, पण कुठही जाणार नाही, असेही साळवी यांनी म्हटले.





