जॉर्डनमध्ये गॅस गळतीमुळे 13 जणांचा मृत्यू; तब्बल 250 जण अत्यवस्थ

अम्मान, (जॉर्डन) – जॉर्डनच्या दक्षिणेकडील अकाबा या बंदरामध्ये विषारी गॅसची गळती झाल्यामुळे किमान 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर किमान 250 जण या विषारी गॅसमुळे अत्यवस्थ आहेत. ही दुर्घटना सोमवारी झाली, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
जहाजावर गॅसचा कंटेनर चढवला जात असताना ही दुर्घटना घडली. मोठा क्रेनच्या सहाय्याने हा कंटेनर जहाजाच्या डेकवर ठेवला जात असताना हा कंटेनर जहाजावर पडला. त्यामुळे या कंटेनरमधील गॅसची गळती व्हायला लागली. या दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कंटेनर जहाजाच्या डेकवर पडताच त्यातून पिवळ्या रंगाचा वायू बाहेर पडायला लागला.
त्यामुळे जहाजावरील कर्मचारी घाबरुन सैरावैरा पळायला लागल्याचे या व्हिडीओमधअये दिसते आहे. ही दुर्घटना कंटेनर जहाजाच्या डेकवर पडल्यामुळे झाल्याच्या वृत्ताला जॉर्डनच्या सार्वजनिक सुरक्षा संचलनालयाने दुजोरा दिला आहे. मात्र या कंटेनरमध्ये कोणता गॅस होता, याची माहिती देण्यात आलेली नाही.
ही दुर्घटना झालेला भाग पूर्ण रिकामा करण्यात आला आहे. सर्व जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे आणि वायू गळती झालेला भाग सुरक्षित करण्यासाठी तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. जखमींची आकडेवारी वेगवेगळी सांगितली जाते आहे. किमान 200 जणाना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे स्थानिक वाहिन्यांनी म्हटले आहे.





