पुणे | बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात येणारी लेखी परीक्षा यंदा आठ ते दहा दिवस आधीपासूनच घेण्यात येणार आहे.
त्यानुसार इयत्ता बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी, तर इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल लवकर लागावेत व पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यासाठी परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला आहे.
बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात व दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होतात. बारावीच्या परीक्षांचा ऑनलाइन निकाल मे अखेरीस व दहावीच्या परीक्षांचा ऑनलाइन निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येतो.
त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणीसुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जाते.
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा.
तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करता यावा, यासाठी सन २०२५ ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी परीक्षा ८ ते १० दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस आहे. त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा यांच्या नियोजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
बारावीची सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय, व्यवसाय अभ्यासकमाची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत घेण्याचे नियोजन आहे. दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च तर प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ही ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत.
हरकती सादर करण्यासाठी २३ अॉगस्ट मुदत
शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने परीक्षांच्या या नियोजित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
याबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या २३ ॉगस्टपर्यंत [email protected] या संकेतस्थळावर पाठवाव्यात. या तारखेनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी जाहीर केले आहे.




