पिंपरी | १२० भाविकांना घेतले साडेतीन शक्तिपीठाचे दर्शन

पिंपरी, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य मार्ग (एसटी) परिवहन महामंडळाच्या पिंपरी-चिंचवड आगारामधून नवरात्र उत्सवानिमित्त साडेतीन शक्तिपीठ दर्शनसाठी तीन एसटी बसेस जादा सोडण्यात आल्या होत्या या तीन बसद्वारे आगाराला तीन लाख बावन्न हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असून, जवळपास १२ भाविकांनी साडेतीन शक्तिपीठचे दर्शन घेतले आहे. त्यामुळे आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी एसटी महामंडळाच्या वतीने भाविकांना साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनासाठी ज्यादा बसेसची सोय केली जाते. यावर्षीदेखील पिंपरी चिंचवड आगारामधून दोन दर्शन बसची सोय केली होती.
मात्र, भाविकांचा प्रतिसाद पाहता दोन्ही बसचे आरक्षण फुल झाले. यामुळे तिसऱ्या आरामदायी बसचीदेखील सोय आगाराद्वारे करण्यात आली होती. या तीनही बस शनिवारी (दि. ५) रोजी भाविकांना घेऊन आगारामधून दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या होत्या.
शक्तिपीठांच्या दर्शनानंतर तीन दिवसांनी या आगारात परतल्या. शहरातील भाविकांच्या उत्तम प्रतिसादामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होत असल्याची माहिती आगारप्रमुखांनी दिली.
नवरात्र उत्सवानिमित्त साडेतीन शक्तिपीठांच्या दर्शनासाठी आगोदर दोन बसेस जादा सोडण्याचा निर्णय होता. मात्र काही काळातच ह्या दोन्ही बसेस फुल्ल झाल्याने अणखी एक बस जादा सोडण्याचा निर्णय घेतला.
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या वतीने दिलेल्या सवलतींचा लाभ जवळपास १२० प्रवाश्यांनी घेतला आहे. त्यामुळे सवलतींद्वारे शासनाकडून येणारी रक्कम १ लाख ९२ हजार ९३५ रुपये एवढी आहे. -वैशाली कांबळे, वल्लभनगर स्थानक प्रमुख





