इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया खोळंबली; सरकारी वेबसाइट ठप्प, विद्यार्थ्यांचा मन:स्ताप

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज, २१ मेपासून अकरावीच्या (FYJC) ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार होती. मात्र, महाराष्ट्र शासनाची प्रवेश वेबसाइट ठप्प झाल्याने लाखो विद्यार्थ्यांना मन:स्तापाला सामोरे जावे लागले आहे. वेबसाइटवर ‘अंडर कन्स्ट्रक्शन’ असा संदेश येत असून, रजिस्ट्रेशन प्रक्रिया रखडली आहे.
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी आजपासून सुरू होऊन २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता बंद होणार होती. विद्यार्थ्यांना केवळ एक आठवड्याचा अवधी देण्यात आला आहे. यात विद्यार्थी किमान एक आणि जास्तीत जास्त दहा कनिष्ठ महाविद्यालयांसाठी पसंती नोंदवू शकतात. मात्र, पहिल्याच दिवशी वेबसाइट हँग झाल्याने राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. यंदा राज्यातील ९,२८१ कनिष्ठ महाविद्यालयांमधील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील २० लाखांहून अधिक जागांसाठी अर्ज अपेक्षित आहेत.
दहावीचा ९४.१० टक्के निकाल –
यंदा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. राज्यातील ९ शिक्षण मंडळांतून १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण १६ लाख १० हजार ९०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५ लाख ९८ हजार ५५३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १४ लाख ८७ हजार ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, ज्याची टक्केवारी ९३.०४ टक्के आहे.
वेबसाइटमधील तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला असून, सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.


