पुणे | साडेतीन वर्षांत ११४२ जणांचा मृत्यू

पुणे, {विजयकुमार कुलकर्णी} : एकेकाळी शिस्तीचे शहर म्हणून ओळख असलेले पुणे आता अपघाताचा सापळा बनत आहे. या अपघातांत मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. साडेतीन वर्षांत शहरात ३ हजार ६०९ अपघातांची नोंद झाली आहे. त्यामध्ये १ हजार ४४२ जणांना जीव गमवाला लागला आहे, तर, २०३१ जण गंभीर जखमी झाले आहेत.
येथील कल्याणीनगर अपघाताची चर्चा देशभर झाल्यानंतर या अपघाताचे विधानसभेतही उमटले होते. असे असले तरी अपघातांचा वेग अजूनही कायमच आहे. शहरातील वाहतूक कोंडी अन बेदरकार वाहनांमुळे नागरिकांना रोज आपला जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.
२०२१, २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये अपघातील मृतांची सख्या ९६ ने वाढली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे रस्त्यांचाही जीव गुदमरू लागला आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनांचीही रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते. वाहतूक कोंडीबरोबरच शहराची ओळख आता अपघातांचे शहर म्हणून होत आहे. वेगाची नशा, विनाहेल्मेट प्रवास, सिग्नल न पाळणे, नियमांचे पालन न करता बेदरकार वाहन चालवणे आदी कारणे अपघातांची कारणे ठरत आहेत.
बेजबाबदार डंपर, पीएमपीएल बस चालक, पाण्याचे टँकर, एवढेच नव्हे, तर कचरा वाहनाचे कंटेनरही आता काळ बनू पाहात आहेत. त्यामुळे वाहन चालवताय जरा सावधान, असेच म्हणण्याची सध्या वेळ आहे. वाहतूक विभागाकडून वारंवार आवाहन करूनही सर्रास हेल्मेट न वापरताच प्रवास केला जात आहे. वाहतूक नियमन करताना पोलीस कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करून नियमभंग करण्याचे प्रकारही वाढीस लागले आहेत.
वर्ष , अपघात , मृत्यू , गंभीर जखमी
२०२१ , ७४१ २५५ , ४५७
२०२२ , ८७१ , ३५५ , ५०७
२०२३ , १२३० , ३५१ , ६५५
२०२४ (जून अखेर) ७६७ १८१ ४१२
एकूण ३६०९ ११४२ २०३१
शहरात अपघात आणि अपघातांत होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे, हे दुर्दैवी आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी शिस्त आणि वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. गाडी आणि व्यक्तीचा विमा काढायला हवा. ॲड. अभिषेक हरगणे, फौजदारी वकील
कशासाठी हवाय विमा?
गाडीच्या विमा काढला पाहिजे. गाड्यांचे नुकसान झाल्यावर ते पेलवणारे नव्हते, तसेच मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केल्यास विमा कंपनी नुकसान भरपाई देऊ शकते. चालकासह इतरांचे विमे असले पाहिजेत. जखमी झाल्यास येणारा खर्चही न परवडणारा असतो, त्यामुळे विमा काढला गरजेचे आहे.





