अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 1100 भारतीय नागरिकांना परत पाठवले

नवी दिल्ली – अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना त्या देशातून चार्टर्ड फ्लाइटने परत पाठवण्यात आले आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी अर्थात डीएचएसने शुक्रवारी सांगितले की, भारत सरकारच्या सहकार्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
वरिष्ठ अधिकारी क्रिस्टी ए. कॅनेगालो म्हणाल्या की , कायदेशीर आधाराशिवाय अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय नागरिकांना परत पाठवले जाईल. तुम्हाला चुकीची माहिती देणाऱ्या स्थलांतरित दलालांना बळी पडू नका.
बेकायदेशीरपणे राहणाऱ्या त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षित परतीची खात्री करण्यासाठी डीएचएस इतर देशांच्या संपर्कात आहे. अवैध स्थलांतर कमी करण्यासाठी आणि सुरक्षित आणि कायदेशीर मार्गांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात डीएचएसने कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, इजिप्त, मॉरिटानिया, सेनेगल, उझबेकिस्तान, चीन आणि भारत यासह अनेक देशांतील नागरिकांना परत पाठवले आहे.
या निर्वासनांबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना अधिकारी रॉयस मरे यांनी सांगितले की, 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या यूएस आर्थिक वर्ष २०२३-२४ दरम्यान सुमारे ११०० भारतीय नागरिकांना हद्दपार करण्यात आले. 22 ऑक्टोबरच्या चार्टर फ्लाइटबद्दल ते म्हणाले की त्या फ्लाइटमध्ये कोणीही अल्पवयीन नव्हते आणि ते सर्व प्रौढ पुरुष आणि महिला होते.
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १६०००० हून अधिक लोकांना काढून टाकले किंवा निर्वासित केले आणि भारतासह १४५ हून अधिक देशांमध्ये ४९५ हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे यासाठी आयोजन करावे लागले. अमेरिकेत राहण्यासाठी कायदेशीर आधार नसलेल्या नागरिकांच्या मायदेशी परत येण्यासाठी ते परदेशी सरकारांसोबत सातत्याने काम करत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.





