रिक्षा अपघातात 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

रिक्षा चालक मामाला अटक : कात्रज जुन्या घाटातील घटना
पुणे – बहीण आणि भाच्याला भोर येथे नेताना रिक्षा उलटल्याने झालेल्या अपघातात 11 महिन्यांचा चिमुकला ठार झाला. हा अपघात जुना कात्रज घाटाच्या अलीकडे घडला. हलगर्जीपणा केल्याप्रकरणी रिक्षाचालक मामाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.
कार्तिक अविनाश पारवे असे मृत्यूमुखी बालकाचे नाव आहे. विकास विजय जाधव (25, रा. हडपसर) असे अटक केलेल्या मामाचे नाव आहे. याप्रकरणी रणजित जालिंदर काटे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी सायंकाळी विकास हा रिक्षातून बहिणीसह भाच्यासह जात होता. त्यावेळी जुन्या कात्रज घाटाच्या अलीकडे अचानक एसटी समोर आली. त्यामुळे विकासने रिक्षावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.
मात्र, रिक्षा उलटल्याने 11 महिन्यांचा कार्तिक गंभीररित्या जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सहायक पोलीस फौजदार मोहन देशमुख तपास करत आहेत.





