दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू, राहुल गांधी म्हणाले, “आम्ही पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहोत…”

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत लाल किल्ल्याच्या (Red Fort) बाहेर झालेल्या भीषण कार स्फोटात आतापर्यंत ११ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ३० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. सध्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुखद घटनेनंतर सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून स्फोटाची सविस्तर माहिती घेतली आहे.
राहुल गांधींकडून दुःख व्यक्त –
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले आहे की, “दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटाची बातमी अत्यंत वेदनादायक आणि चिंताजनक आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, “या दुःखद अपघातात अनेक निर्दोष लोकांच्या मृत्यूची बातमी खूपच दुःखद आहे. या कठीण प्रसंगी मी प्रियजनांना गमावलेल्या शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी आहे. सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी माझी आशा आहे.”
दिल्ली के लाल किला मेट्रो स्टेशन के पास हुए कार विस्फोट की ख़बर बेहद दर्दनाक और चिंताजनक है। इस दुखद हादसे में कई निर्दोष लोगों की मृत्यु का समाचार अत्यंत दुखद है।
इस दुख की घड़ी में अपने प्रियजनों को खोने वाले शोक संतप्त परिवारों के साथ खड़ा हूं और उनको अपनी गहरी संवेदनाएं…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 10, 2025
संध्याकाळी ६:३० ते ७ च्या दरम्यान स्फोट –
या भीषण कार स्फोटाबद्दल एका प्रत्यक्षदर्शीने प्रसार माध्यमांना सविस्तर माहिती दिली. हा स्फोट संध्याकाळी ६:३० ते ७ वाजण्याच्या दरम्यान झाला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, “सुरुवातीला नेमका कशाचा इतका मोठा आवाज झाला हे आम्हाला समजलेच नाही. स्फोट झाला तेव्हा सिग्नलला रस्त्यावरील सर्व वाहने थांबलेली होती आणि परिसरात लोकांची मोठी गर्दी होती.
धमाका होताच सर्वत्र एकच धावपळ उडाली आणि लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. हा स्फोट इतका भीषण होता की जवळच्या मंदिरांच्या काचाही फुटल्या.” त्याने पुढे सांगितले, “या दुर्घटनेनंतर अनेक लोक गंभीर जखमी झाले असून मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडले आहेत. स्फोटाच्या वेळी मी माझ्या कारमध्ये थोड्याच अंतरावर होतो आणि धमाका झाल्यानंतर तेथे सर्वत्र रक्ताचे थेंब पसरले होते.”





