पुणे | दहावी, बारावी पुरवणी परीक्षा आजपासून

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या जुलै- ऑगस्ट २०२४ ची पुरवणी परीक्षा मंगळवार (दि. १६) पासून सुरू होणार आहे. राज्य मंडळामार्फत प्रसिद्ध व छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे. अन्य संकेतस्थळांवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, अशा सूचनाही जारी करण्यात आलेल्या आहेत.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता दहावीची पुरवणी परीक्षा ३० जुलैपर्यंत, तर बारावीची पुरवणी परीक्षा ८ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
सकाळच्या सत्रात सकाळी १०.३० वाजता व दुपारच्या सत्रात दुपारी २.३० वाजता परीक्षार्थ्याने परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळ सत्रात सकाळी ११ वाजता, तसेच दुपारच्या सत्रात दुपारी ३ वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल.
फेब्रुवारी- मार्च २०२४ परीक्षेप्रमाणेच जुलै- ऑगस्ट २०२४ परीक्षेमध्ये पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहेत. पुरवणी परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन व श्रेणी आदी परीक्षांचे ऑनलाइन पद्धतीने गुण भरून घेण्यात येणार आहेत. याबाबतची लिंक व सविस्तर सूचना विभागीय मंडळांमार्फत सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेल्या आहेत, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.
पुरवणी परीक्षेसाठी झालेली विद्यार्थ्यांची नोंदणी
तपशील – इयत्ता दहावी – इयत्ता बारावी
मुले – २०३७० – ३६५९०
मुली – ८६०५ – २०२५०
ट्रान्सजेंडर – ०१ – ०५
एकूण – २८९७६ – ५६८४५





