train news : विनाकारण साखळी ओढल्याने १०७५ रेल्वेंना विलंब; ७९३ जणांवर गुन्हा दाखल

train news – संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे १९७ मेल/एक्स्प्रेस गाड्यांना उशीर झाला आहे. त्यामुळे एकट्या नोव्हेंबर महिन्यात सरासरी १० मिनिटांचा वक्तशीरपणा कमी झाल्यामुळे प्रवाशांनी विनाकारण साखळी ओढू नये, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेने एकूण ७९३ व्यक्तींविरुद्ध अवास्तव संकटकालीन साखळी खेचण्याच्या गैरवापराचे गुन्हे नोंदवले. तसेच तब्बल २.७२ लाख रूपयांचा दंड वसूल केला. एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेवर विनाकारण संकटकालीन साखळी खेचण्याच्या घटनांमुळे एकूण १०७५ गाड्या उशीराने धावल्या.
यात मुंबई विभागातील ३४४ मेल/एक्स्प्रेस गाड्या, भुसावळ विभागात ३५५ गाड्या, नागपूर विभागात २४१ गाड्या, पुणे विभागात ९६ गाड्या विभाग आणि सोलापूर विभागात ३९ गाड्यांचा समावेश आहे. अशा साखळी खेचण्याच्या घटनांमुळे मध्य रेल्वेवर मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे ८.२९% वक्तशीरपणाचे नुकसान होते.
केवळ नोव्हेंबर महिन्यात, मध्य रेल्वेवर, साखळी खेचण्याच्या घटनांमुळे, एकूण १९७ गाड्या उशीराने धावल्या आणि गाड्यांचा सरासरी वक्तशीरपणा १० मिनिटांनी कमी झाला. उदा. मुंबई विभागात ७३ मेल/एक्स्प्रेस, भुसावळ विभागात ५३, नागपूर विभागात ३४, पुणे विभागात ३० आणि सोलापूर विभागात ८ गाड्यांना उशिर झाला.
रेल्वेने प्रत्येक उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये संकटकालीन साखळी खेचण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. उशिरा पोहोचणे, मध्यवर्ती स्थानकांवर चढ-उतार करणे इत्यादी अनावश्यक कारणांसाठी प्रवासी संकटकालीन साखळी खेचण्याचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे.
पाठीमागून धावणाऱ्या रेल्वेंवरही परिणाम
ट्रेनमधील साखळी खेचण्याच्या कृतीचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनच्या धावण्यावरच परिणाम होत नाही तर पाठीमागून येणाऱ्या गाड्यांवरही मोठा परिणाम होतो. मुंबई विभागासारख्या उपनगरीय चलन प्रणालीमध्ये अशा घटनांमुळे मेल/एक्स्प्रेस व उपनगरीय गाड्या उशिराने धावतात आणि त्यांच्या वक्तशीरपणाला बाधा येते. पुढे एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी साखळी खेचण्याच्या गैरवापराने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते.





