तबलिगशी संबंधित 1,023 जन पॉझिटिव्ह

नवी दिल्ली – देभरातील 17 राज्यांमध्ये सापडलेल्या 1,023 करोना पॉझिटिव्ह रुग्णांचा तबलिगी जमातच्या धार्मिक समारंभाशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सांगितले.
या धार्मिक समारंभाशी संबंधित असलेल्या एकूण 30 टक्के सदस्यांना करोनाची लागण झाली असल्याचे यामुळे अधोरेखित झाले आहे. एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने एकत्र आल्यामुळेच ही संसर्गाची लागण झाली होती, हे देखील आता स्पष्ट झाले असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अगरवाल यांनी दैनंदिन वार्तालापात सांगितले. करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची देशातील संख्या दुप्पट होण्याचा भारतातील कालावधी अन्य देशांच्या तुलनेत कमी असल्याचेही अगरवाल यांनी सांगितले.
देशभरात आतापर्यंत 3 हजारांच्या जवळ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 183 जण या आजारातून बरे झाले आहेत. देशभरात 68 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात शुक्रवारपासून 12 जणांची भर पडली आहे, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला तबलिगी जमातने दिल्लीच्या पश्चिम निजामुद्दीन भागात धार्मिक सभा आयोजित केली होती. हे ठिकाण करोनासाठीचे “हॉटस्पॉट’ ठरले असल्याचे नंतर निष्पन्न झाले.





