पुण्याचे 10वेळा सर्वेक्षण!

46,91,526 घरांची तपासणी
पुणे – शहरातील करोना संशयितांचा शोध घेण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. यात मागील तीन महिन्यांत सुमारे 4 लाख 69 हजार मिळकतींचे प्रत्येकी जवळपास 10 वेळा अशी 46,91,526 घरांची पाहणी केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
सध्या महापालिकेने 194 पथकांच्या माध्यमातून करोना संशयितांसह, इतर आजार असलेले नागरिक, गर्भवती तसेच ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. त्यात, प्रामुख्याने ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्यात येत आहे.
शहरात दि. 9 मार्च रोजी पहिला करोना बाधित आढळल्यानंतर रुग्ण सापडलेल्या 3 किमीच्या परिसरात महापालिकेने सर्वेक्षण हाती घेतले होते. त्यानंतर दि. 21 मार्चपासून पालिकेने संपूर्ण शहराचेच सर्वेक्षण हाती घेतले. त्यानंतर, आतापर्यंत वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तब्बल 10 वेळा शहराचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेच्या शाळांचे शिक्षक, वैद्यकीय कर्मचारी तसेच लेखनिकांची मदत घेण्यात आली.





