छत्तीसगडमध्ये चकमकीत 10 नक्षलवादी ठार; शस्त्रसाठा जप्त

सुकमा (छत्तीसगड) – छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील भेज्जी पोलीस स्टेशन परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी तीन स्वयंचलित रायफल आणि इतर शस्त्रे जप्त केली आहेत.
आज सकाळी नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. अनेक नक्षलवादी ओडिशातून छत्तीसगडमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. डीआरजीची टीम नक्षलवाद्यांना घेरण्यासाठी निघाली होती. दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. अनेक स्वयंचलित शस्त्रेही सापडली आहेत. ही चकमक कोराजुगुडा, दंतेसपुरम, नागराम, भांडारपदरच्या जंगल-टेकड्यांमध्ये झाली. या भागात सैनिक शोध मोहीम राबवत होते. शोध मोहिमेदरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. जवानांनीही प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी बराच वेळ गोळीबार सुरू होता. बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे.
याआधी दक्षिण बस्तर, गरिआबंद आणि कांकेरमध्येही सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. छत्तीसगडच्या अबुझमद जंगलात १६ नोव्हेंबरला नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती. या काळात पाच नक्षलवादी ठार झाले असून मृतदेह सापडले आहेत. यामध्ये 40 लाखांचे बक्षीस असलेले नक्षलवादी सुरक्षा दलांनी मारले आहेत. सर्व नक्षलवाद्यांवर प्रत्येकी आठ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
मुख्यमंत्री विष्णुदेव साई आनंदी –
सुरक्षा दलांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री विष्णुदेव साई म्हणाले की, त्यांचे सरकार नक्षलवादाबद्दल शून्य सहनशीलतेच्या धोरणावर काम करत आहे. बस्तरमधील विकास, शांतता आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही त्यांच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचेही त्यांनी सांगितले. बस्तरमध्ये शांतता, विकास आणि प्रगतीचे युग परत आले आहे.
सुरक्षा दलांच्या अदम्य साहस आणि समर्पणाबद्दल त्यांचे अभिनंदन करून ते म्हणाले की, छत्तीसगडमधून नक्षलवाद्यांचा खात्मा निश्चित आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च 2026 पर्यंत छत्तीसगडमधून नक्षलवाद्यांचा नायनाट करण्याचे ठरवलेले लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जात आहोत.





