नवी दिल्ली – नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल म्हणजे एनसीएसवर सध्या खासगी आणि सरकारी कंपन्यातील दहा लाख नोकऱ्या उपलब्ध असल्याचे केंद्रीय कामगार मंत्रालयाने म्हटले आहे. विशेष म्हणजे यातील 30% नोकऱ्या या फ्रेशरसाठी आहेत. त्यामुळे कॉलेजमधून पास झालेल्या व्यक्तींना या पदासाठी प्रयत्न करता येणार आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात या पोर्टलवर फक्त 5 लाख 60 हजार नोकऱ्या होत्या. त्या जूनमध्ये 7 लाख 60 हजार झाल्याने आता हा आकडा दहा लाखावर गेला आहे. ज्या नौकऱ्या उपलब्ध आहेत त्यामध्ये विक्री प्रतिनिधी, डेटा एन्ट्री ऑपरेटर, लॉजिस्टिक एक्झिक्युटिव्ह, सॉफ्टवेअर इंजिनिअर, मेंटेनन्स इंजिनिअर या नोकऱ्याचा समावेश आहे.
ज्या कंपन्यामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या कंपन्यांना या पोर्टलवर या संदर्भात माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे तरुणांना रोजगार शोधण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर देशात किती प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतात याची माहिती उपलब्ध होणार आहे.
एकूण आकडेवारी पाहता रोजगाराच्या संधी वाढत असल्याचे दिसून येते.
ज्या क्षेत्रामध्ये या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्यामध्ये 51% नोकऱ्या वित्त आणि विमा क्षेत्रात आहेत. तर 13% नोकऱ्या वाहतूक आणि गोडाऊन क्षेत्रात आहेत. आगामी काळात उत्सवात येणार आहे. त्या कालावधीत नोकऱ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यातील 38% नोकऱ्या राष्ट्रीय पातळीवरील तर 18% नोकऱ्या राज्य पातळीवरील आहेत. पोर्टलवर देशातील 15 लाख कंपन्यांनी नाव नोंदणी केली. यातील 68% कंपन्या सेवा क्षेत्रातील तर 26 टक्के मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील आहेत.