Russia-Ukraine war : रशियाच्या माऱ्यात युक्रेनमधील १० ठार !

Russia-Ukraine war – रशियाने रात्रीदरम्यान युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माऱ्यात किमान १० जण ठार झाले आहेत. यापैकी ७ जण राजधानी किव्हमध्ये मारले गेले आहेत. रशियाच्या माऱ्यात कोसळलेल्या एका इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही जण गाडले गेल्याचा संशय असून त्यांचा शोध सुरू असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
रशियाने रात्रभरात युक्रेनवर ३५२ ड्रोन आणि रॉकेटचा मारा केला आणि ११ बॅलिस्टिक आणि ५ क्रूझ क्षेपणास्त्रेही डागली. युक्रेनच्या हवाई संरक्षण प्रणालीने ३३९ ड्रोन आणि १५ क्षेपणास्त्रे एकतर पाडली किंवा हवेतच निष्प्रभ केली, असे युक्रेनच्या हवाई दलाने म्हटले आहे.
रशियाने आठवड्याभरानंतर युक्रेनवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. यापुर्वीच्या माऱ्यात युक्रेनमधील २८ जण ठार झाले होते. रशियाच्या क्षेपणास्त्रामुळे कोसळलेल्या एका इमारतीतील २३ रहिवासी या एका हल्ल्यातच मारले गेले होते.
उन्हाळ्यातील रणनिती म्हणून गेल्या काही महिन्यांपासून रशियाचे सैन्य युक्रेनच्या हद्दीत खोलआतपर्यंत घुसण्याचा प्रयत्न करत आहे. आता रशियाचे सैन्य फ्रंटलाईनपासून अवघे एक हजार किलोमीटर अंतरावर आहे.
मात्र अजूनही रशियाच्या सैन्याला यशस्वी चढाई करण्यात अपयश येते आहे. युक्रेनचे खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने रशियाच्या सैन्याकडून जाणीवपूर्वक नागरी वसाहतींना लक्ष्य केले जाते आहे, असे निरीक्षकांनी म्हटले आहे.
रशिनाने रुग्णालये, निवासी भागात ड्रोन हल्ला केला. कीवमधील अनेक जिल्ह्यांमधील निवासी क्षेत्रे, रुग्णालये आणि क्रीडा पायाभूत सुविधांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा झाला. सर्वात जास्त नुकसान शेवचेनकिव्स्की जिल्ह्यात झाले, तिथे पाच मजली अपार्टमेंट इमारतीचा एक भाग कोसळला, असे आपत्कालीन सेवांनी सांगितले.
रशियाला इराण, उत्तर कोरियाची मदत…
रशियाच्या सैन्याला उत्तर कोरियाच्या सैनिकांची मदत मिळत आहे. तर रशियाला इराणकडून ड्रोन देखील उपलब्ध होत असल्याचे प्राथमिक निरीक्षणात आढळल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे.
रशियावर दबाव आणण्यासाठी झेलेन्स्की ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची भेट घेण्यासाठी ब्रिटनला जाणार आहेत. त्यानंतर नेदरलॅन्डमध्ये द हेग येथे नाटो सदस्य देशांच्या परिषदेलाही ते जाणार आहेत.





