Wagholi News : वाघोलीच्या चिमुकल्या गार्गीच्या उपचारांचा मार्ग मोकळा; दानशूरांच्या मदतीतून १० कोटींचा टप्पा पूर्ण
Wagholi News : वाघोली येथील एका वर्षाच्या चिमुकल्या गार्गी संदीप जाधव हिच्या उपचारांसाठी आवश्यक असलेला तब्बल १० कोटी रुपयांचा निधी अखेर पूर्ण झाला आहे

Wagholi News : दुर्मिळ एसएमए आजाराशी झुंज देणाऱ्या वाघोलीतील एक वर्षाच्या गार्गी संदीप जाधव हिच्या उपचारांसाठी महाराष्ट्रभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आणि अखेर १० कोटी रुपयांचा निधी जमा झाला. १९ ऑक्टोबर रोजी निधी उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने गार्गीच्या उपचारांना लवकरच सुरुवात होण्याची आशा निर्माण झाली आहे. एका चिमुकलीचे आयुष्य वाचवण्यासाठी नागरिकांनी दाखवलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Wagholi News)
गार्गीला स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (एमएमए टाईप १) हा गंभीर आजार झाला आहे. या आजारामुळे शरीरातील स्नायूंवर परिणाम होतो. तिच्या उपचारांसाठी ‘झोल्गेन्स्मा’ हे अत्यंत महागडे इंजेक्शन आवश्यक असून, त्यासाठी सुमारे १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. एवढी मोठी रक्कम उभी करणे जाधव कुटुंबीयांसमोर मोठे आव्हान होते. (Wagholi News)
गार्गीच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन तिच्या कुटुंबीयांनी १ ऑगस्ट रोजी केले. त्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मोहीम वेगाने पसरली. विविध सामाजिक संस्था, कार्यकर्ते, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि सर्वसामान्य नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेत आर्थिक मदत केली. छोट्या-मोठ्या देणग्यांतून जमा झालेल्या रकमेमुळे अखेर १९ ऑक्टोबरला १० कोटींचा टप्पा गाठण्यात यश आले. (Wagholi News)
गार्गीच्या उपचारांसाठी आवश्यक निधी जमा झाल्याने तिच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता पुढील वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून उपचार सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. एका वर्षाच्या चिमुकलीसाठी हजारो हात एकवटल्याने माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय या मोहिमेतून आला आहे. (Wagholi News)
तुमच्या प्रत्येकाच्या लहान-मोठ्या मदतीने, प्रार्थनेने आणि सहकार्याने आम्हाला ही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करता आली. या कठीण प्रवासात साथ देणाऱ्या सर्व देणगीदारांचे, हितचिंतकांचे आणि पाठिराख्यांचे आम्ही आयुष्यभर ऋणी राहू. – जाधव कुटुंबिय





