गडचिरोलीत 1 लाख झाडांची कत्तल; लोह खाणीतील प्रकल्पासाठी घेतला निर्णय

Gadchiroli News | गडचिरोलीतील एक लाख झाडे तोडण्यासाठी वन्यजीव संरक्षणाच्या अटीसह परवानगी देण्यात आली आहे. सूरजागड लोह खाणीतील उत्खनन क्षमतेच्या वाढीला पर्यावरण विभागाने मंजुरी दिल्यानंतर अवघ्या 15 दिवसांत एक लाख झाडांची कत्तल केली जाणार आहे.
या निर्णयामुळे 937 हेक्टर वनजमीन खाणकामासाठी वापरली जाणार असून 1.23 लाख झाडे तोडली जाणार आहे. याला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे एक लाखापेक्षा जास्त वृक्षाची कत्तल होईल आणि या भागाततील टायगर कॉरिडोर देखील धोक्यात येईल, असे मत पर्यावरणवाद्यांनी म्हंटले आहे.
याशिवाय या भागातील 50 हजारांहून अधिक आदिवासी विस्थापित होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. हा प्रकल्प नक्षलग्रस्त भागात असल्याने जंगल नष्ट होत असल्याची भूमिका घेत आदिवासी विरोध करीत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अनेक याचिका दाखल आहेत.
उत्खनन क्षमता 10 दशलक्षवरून 26 दशलक्ष टन
दोन महिन्यांपूर्वी लॉयड मेटल्स कंपनीची उत्खनन क्षमता 10 दशलक्षवरून 26 दशलक्ष टन इतकी करण्यासाठी पर्यावरण विषयक जन सुनावणी प्रशासनाकडून घेण्यात आली होती. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड येथे लँड्स मेटल नामक कंपनी वाढीव उत्खननासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती. राज्य सरकारने याला हिरवा कंदील देत सुरजागड महाराष्ट्र- छत्तीसगड सीमावर्ती भागात असलेल्या घनघाट जंगलातील एक लाख वृक्ष तोडण्याची अनुमती दिली.
दरम्यान, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून सूरजागड टेकडीवर लोहखनिज उत्खनन सुरु आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीला 348 हेक्टर परिसरातील खाणीचे कंत्राट देण्यात आले आहे. या टेकडीवर जवळपास पाच खाणपट्ट्यांच्या कंत्राटाची निविदा प्रक्रिया सुरु आहे. हा परिसर महाराष्ट्रापासून छत्तीसगढपर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण जंगलाचा भाग आहे. Gadchiroli News |
हेही वाचा:
Maharashtra Politics | अमरावतीत शिंदेंचा ‘पॉवर प्ले’! ठाकरे गटातील मोठं नाव शिंदे गटात





