सावधान! तुमचीही ‘अशी’ फसवणूक होऊ शकते; सहायक प्राध्यापिकेला १ लाख ८३ हजार रुपयांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर – तुमच्या नावाने दुसरे एक सिमकार्ड सुरू असून त्यावर वेगवेगळ्या तक्रारी पोलिसात दाखल आहेत. दोन कोटींचा मनी लाँड्रिंगचा गुन्हादेखील मुंबईत दाखल असल्याची धमकी देऊन एका नामांकित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापिकेला १ लाख ८३ हजार रुपयांचा गंडा घातला. या आरोपीने महिलेला अडीच तास ‘डिजिटल अरेस्ट’ही केले. (1 lakh 83 thousand rupees fraud of assistant professor)
हा प्रकार ३० एप्रिलला सकाळी सव्वानऊच्या सुमारास सुराणानगर भागातील गुरुरामदासनगर येथे घडला. या फसवणुकीसाठी चोरट्यांनी चक्क सर्वोच्च न्यायालयाची बनावट वेबसाइटही पाठवली. आयुषी राजकुमार जैन (२७, रा. प्लॉट क्र ११, गुरुरामदासनगर, सुराणानगर) या सहायक प्राध्यापिका आहेत.
त्या हॉस्पिटलमध्ये असताना त्यांना सायबर चोरट्याने फोन केला. त्याने एअरटेल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून, तुमच्या आधार आणि पॅन नंबरवर आणखी एक सिमकार्ड सुरू आहे. त्याद्वारे अनधिकृतपणे माहिती पसरवली जात आहे. मुंबईत एक गुन्हा दाखल असून सिमकार्ड व बँकिंग सेवाही बंद होतील, असे सांगितले. सेवा सुरू ठेवायची असेल, तर ‘मुंबई पोलिस ०२०९ स्काइप’ हे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
व्हेरिफिकेशनसाठी व्हिडिओ काॅल केला. त्या वेळी चोरट्यांनी पोलिसांचा गणवेश परिधान केलेला होता. त्यानंतर ‘शांती सेवा न्याय’ असे डॉक्युमेंट आयुषी यांना पाठवले. तुमच्याविरुद्ध १७ तक्रारी असल्याचे त्यात नमूद होते. त्यावर फिर्यादी घाबरून गेल्या. त्यांनी, माझे लोकेशन चेक करा, असे सांगितले. मात्र, तुमच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगची दोन कोटींची तक्रार आहे. हे तुमचे कॅनरा बँकेचे एटीएम आहे, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी एका बेवसाइटची लिंकही पाठवली.
वेबसाइटवर ‘डायरेक्टर ऑफ एन्फोर्समेंट’ची कागदपत्रे होती. ती सायबर चोरट्याने त्यांना वाचण्यास सांगितली. त्यात आयुषी यांच्याविरुद्ध वॉरंट असल्याचे नमूद होते. त्यावर त्याने, आमच्या वरिष्ठांशी बोला, मी काहीच मदत करू शकत नाही,’ असे म्हणत सहकाऱ्याकडे फोन दिला.





