महापालिकेचा निर्णय : वारसाला नोकरी देण्याचीही तरतूद
पिंपरी – करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी नेमणूक केलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांचे विमा सुरक्षा कवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज (बुधवारी) घेण्यात आला आहे. करोना संकटाच्या काळात जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या वैद्यकीय, आरोग्य आणि इतर कर्मचाऱ्यांना यामुळे आधार मिळणार आहे. तसेच, दुर्देवी घटना दुर्घटना घडल्यास एक कोटी रुपयांच्या रक्कमेसह त्यांच्या वारसाला पालिकेत नोकरीही दिली जाणार आहे.
सद्यस्थितीत जगभर करोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रामध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय, आरोग्य, तसेच इतर विभागातील बऱ्याच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यावेळी हे नेमणूक केलेले कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी दिवसरात्र काम करत आहे.
मात्र, करोनाचा प्रतिबंध करत असताना नेमणूक केलेल्या वैद्यकीय अधिकारी, नर्सेस व इतर स्टाफ यांचा करोनाचा प्रादुर्भाव झालेल्या व संशयित रुग्णाशी थेट संपर्क येत असतो. त्याचप्रमाणे सर्व्हेसाठी नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांचा देखील थेट संपर्क येऊ शकतो. त्यामुळे एखाद्या कर्मचाऱ्याला करोनाचा संसर्ग झाल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी या कर्मचाऱ्यांना योग्य असे सुरक्षा कवच व प्रशासनाचा आधार असणे अत्यंत आवश्यक आहे. तशी मागणी महापालिका कर्मचारी महासंघाकडून देखील करण्यात आली होती.
दरम्यान, याबाबत सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करुन हा विमा सुरक्षा कवच लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ज्या कर्मचाऱ्यांची करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचे बाबतीत काही दुर्देवी दुर्घटना घडल्यास त्यांना महापालिकेमार्फत सुरक्षा कवच म्हणून एक कोटी रक्कम देणे व त्यांचे वारसास मनपा सेवेत नोकरी देणे, अशा प्रकारची तरतूद याअंतर्गत करण्यात आली आहे, असे महापौर माई ढोरे यांनी सांगितले आहे.