Hingoli : वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; आंबा, कांदा, हळद पिकांचे मोठे नुकसान, पंचनाम्याची मागणी
Hingoli: महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Hingoli : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात शुक्रवारी (दि. ८) सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, काढणीला आलेले कच्चे आंबे मोठ्या प्रमाणावर झाडांवरून खाली पडल्याने बागायतदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
सेनगाव तसेच कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंब्यांच्या बागांतील कैऱ्या जमिनीवर पडल्या. याशिवाय हळद, कांदा, पपई आणि टोमॅटो पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विक्रीसाठी तयार झालेला आंबा अचानक आलेल्या पावसामुळे खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सेनगाव तालुक्यातील माझोड येथील अनेक शेतकऱ्यांच्या आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले. यात शिवाजी घूगरे, काशीराम घूगरे, अनिरुद्ध घूगरे, दिनकर मगर, बाळू मूळे, रामकिसन घूगरे, गंगाधर मूळे, बालाजी मूळे, गजानन मगर, शिवाजी मूळे आणि गजानन शेळके यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचा समावेश आहे.
शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर कैऱ्या पडून नुकसान झाले असून, महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
लग्नसमारंभांनाही फटका –
दरम्यान, अवकाळी पावसाचा फटका लग्नसमारंभांनाही बसला. सेनगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये लग्नसोहळे सुरू असताना अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी मंडप उडून गेले. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींची गैरसोय झाली. काही ठिकाणी पावसातच विवाहसोहळे पार पाडावे लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.





