Satara: मराठी अभ्यास केंद्रातर्फे दहिवडी येथे उद्या परिसंवाद; मराठी भाषा आणि संस्कृतीच्या अस्तित्वासाठी उपक्रम
Satara मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६० मध्ये झाली.

Satara: आधुनिक महाराष्ट्राच्या वैचारिक व सांस्कृतिक वारशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असलेले महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, रा. ना. चव्हाण यांच्या साताऱ्यात मराठी अभ्यास केंद्राच्यावतीने समकालीन महाराष्ट्राच्या प्रश्नांवर परिसंवाद आणि ‘महाराष्ट्र धर्म व मराठीकारण शिबिर’ अशा दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी दिली.
या कार्यक्रमांमध्ये दहिवडी (गोंदवले रस्ता) येथील ब्रह्मचैतन्य मंगल कार्यालयात मंगळवारी (दि. २५) सायंकाळी ४ वाजता समकालीन महाराष्ट्राच्या प्रश्नांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. डॉ. दीपक पवार, डॉ. प्रकाश परब, प्राजक्ता जोशी व प्रा. रोहित पाटील या परिसंवादातील मुख्य वक्ते आहेत. ते अनुक्रमे पुढील विषयांवर मांडणी करणार आहेत. संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा, धर्मकारण आणि भाषाकारण, महाराष्ट्राचा विनाशकारी विकास, परिसीमन (डिलिमिटेशन) आणि महाराष्ट्रापुढील धोके.
तर सातारा शहरात राजवाड्याजवळील महिला मंडळ सभागृहात बुधवारी (दि. २६) सायंकाळी ४ वाजता मराठीकारण- महाराष्ट्रधर्म शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरातील मुख्य वक्ते डॉ. दीपक पवार (समकालीन महाराष्ट्र), डॉ. प्रकाश परब (भाषा आणि धर्म), डॉ. नीरज हातेकर (मराठी माणसांचा रोजगार) व प्रथमेश पाटील (महाराष्ट्रातील विनाशकारी विकास प्रकल्प) अशा विषयांवर मांडणी करणार आहेत.
मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६० मध्ये झाली. तत्कालीन मराठी समाजाने प्रगत आणि सुसंस्कृत महाराष्ट्राचे जे स्वप्न पाहिले होते त्याच्याशी अत्यंत विपरीत अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र आज भाषिक आणि सांस्कृतिक बाबतींतही आपली ओळख हरवत चालला आहे. वाढत्या स्थलांतरामुळे आर्थिक, सांस्कृतिक प्रश्न निर्माण झाले आहेत. मराठी शाळा बंद पडत आहेत किंवा बंद पाडल्या जात आहेत. त्यामुळे मराठी भाषा आणि संस्कृती यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मराठी समाजाला भाषिक, सांस्कृतिक, वैचारिक आत्मभान आणून देणे आवश्यक आहे. हे आत्मभान म्हणजेच ‘महाराष्ट्रधर्म व मराठीकारण’. मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी माणूस आणि महाराष्ट्र यांविषयी आस्था असणाऱ्या सर्वांनी या दोन्ही कार्यक्रमांना यावे, असे आवाहन डॉ. दीपक पवार यांनी केले आहे.





