लक्षवेधी : अन्नअर्थव्यवस्थेचे बदलते परिमाण
फिक्की आणि डेलाइट यांच्या 2026 मधील संयुक्त अहवालानुसार, भारतातील प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांची बाजारपेठ (Food Economy) 2030 पर्यंत सुमारे सहाशे अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. पण खरोखर अशी परिस्थिती आहे का?

– सत्यसाई पी एम
Food Economy : फिक्की आणि डेलाइट यांच्या 2026 मधील संयुक्त अहवालानुसार, भारतातील प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांची बाजारपेठ (Food Economy) 2030 पर्यंत सुमारे सहाशे अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. पण खरोखर अशी परिस्थिती आहे का?
शहरीकरण, बदलती जीवनशैली, डिजिटल व्यापार आणि आरोग्यविषयक जागरूकता यामुळे अन्नपदार्थांच्या मागणीचे (Food Economy) स्वरूप बदलत आहे. ग्राहकांची पसंती केवळ स्वस्त आणि सहज उपलब्ध अन्नपदार्थांपुरती मर्यादित राहिलेली नाही. पौष्टिक, सुरक्षित, दर्जेदार, सहज वापरता येणार्या आणि विशिष्ट वैशिष्ट्ये असलेल्या उत्पादनांकडे कल वाढत आहे.
त्यामुळे अन्नप्रक्रिया उद्योग हा केवळ कृषी उत्पादनावर आधारित पूरक व्यवसाय न राहता उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि निर्यात यांना जोडणारा आर्थिक विकासाचा महत्त्वाचा आधार बनत आहे.
भारताच्या अन्नबाजारपेठेच्या विस्ताराचा सर्वाधिक महत्त्वाचा दुवा म्हणजे शेतमालाचे मूल्यवर्धन. शेतातून बाजारपेठेत पोहोचणारा कच्चा माल आणि त्याच मालावर प्रक्रिया करून तयार केलेले उत्पादन यांच्या आर्थिक मूल्यात मोठी तफावत असते. टोमॅटोचे उदाहरण घेतल्यास, त्याचे उत्पादन करून विक्री करण्यापेक्षा त्यापासून सॉस, प्युरी किंवा निर्जलित पदार्थ तयार केल्यास अधिक मूल्य निर्माण होऊ शकते.
आंबा, डाळिंब, केळी, संत्री, हळद, मिरची आणि इतर कृषिमालाच्या बाबतीतही हीच संधी उपलब्ध आहे. मात्र, या मूल्यवर्धनातून निर्माण होणार्या नफ्याचा योग्य वाटा शेतकर्यांपर्यंत पोहोचतो का, हा मूलभूत प्रश्न आहे. प्रक्रिया उद्योगाची वाढ आणि शेतकर्यांच्या उत्पन्नातील वाढ यांचा परस्परसंबंध आपोआप निर्माण होत नाही. त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, दीर्घकालीन खरेदी करार, पारदर्शक दरनिर्धारण व स्थानिक प्रक्रिया केंद्रे यांची भूमिका महत्त्वाची ठरते.
अन्नबाजारपेठेच्या (Food Economy) विस्तारातील आणखी एक गंभीर अडथळा म्हणजे काढणीनंतर होणारे नुकसान. शेतमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते; परंतु साठवणूक, शीतगृह, वाहतूक, वर्गीकरण आणि प्रक्रिया सुविधांच्या अभावामुळे उत्पादित मालाचा काही भाग वाया जातो. ही केवळ शेतकर्यांच्या उत्पन्नाची हानी नसून देशाच्या संसाधनांचीही नासाडी आहे.
पाणी, जमीन, ऊर्जा, श्रम आणि भांडवल यांच्या साहाय्याने निर्माण झालेला शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट होणे ही विकासाच्या मॉडेलमधील गंभीर त्रुटी आहे. म्हणूनच एकात्मिक शीतसाखळी, ग्रामीण गोदामे, आधुनिक वाहतूक व्यवस्था आणि कृषी प्रक्रिया केंद्रे यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाचा रोजगारनिर्मितीशी असलेला संबंधही तितकाच महत्त्वाचा आहे.
कृषी क्षेत्रातील हंगामी रोजगार, ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर आणि तरुणांसमोरील रोजगाराचे मर्यादित पर्याय या समस्यांवर स्थानिक प्रक्रिया उद्योग काही प्रमाणात उत्तर ठरू शकतात. फळे आणि भाजीपाल्याचे वर्गीकरण, दुग्धप्रक्रिया, धान्य प्रक्रिया, मसाल्यांचे उत्पादन, पॅकेजिंग आणि शीतसाखळी यांसारख्या क्षेत्रांत ग्रामीण तरुणांसाठी रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण होऊ शकतात.
विशेषतः महिला बचतगट, स्वयंसहायता गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना आधुनिक तंत्रज्ञान, कर्ज आणि विपणनाची जोड मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेत व्यापक परिवर्तन घडू शकते. मात्र, केवळ उद्योग उभारण्यावर भर देऊन चालणार नाही. कौशल्यविकास, अन्नसुरक्षा मानके, गुणवत्ता नियंत्रण, बाजारपेठेचे ज्ञान आणि आर्थिक साक्षरता यांचीही सांगड घालावी लागेल.
जागतिक बाजारपेठेतील (Food Economy) भारताचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी निर्यातक्षम उत्पादनांची गुणवत्ता आणि विश्वासार्हता निर्णायक ठरणार आहे. भारताकडे मसाले, चहा, कॉफी, सागरी उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, फळे आणि विविध पारंपरिक खाद्यपदार्थांची मोठी क्षमता आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळविण्यासाठी केवळ उत्पादन पुरेसे नसते.
अन्नसुरक्षा मानके, अवशेष मर्यादा, प्रमाणपत्रे, सातत्यपूर्ण पुरवठा, आकर्षक पॅकेजिंग आणि ग्राहकांच्या पसंतीनुसार उत्पादनात बदल करणे आवश्यक असते. युरोपीय बाजारपेठेसारख्या विकसित अर्थव्यवस्थांमध्ये गुणवत्ता आणि पर्यावरणीय निकष अधिक कठोर असतात. त्यामुळे मुक्त व्यापार करारांमुळे आयात शुल्क कमी होण्याच्या संधी उपलब्ध झाल्या, तरी त्यांचा लाभ घेण्यासाठी भारतीय उत्पादकांची स्पर्धात्मक क्षमता वाढवावी लागेल. व्यापार करार हे संधीचे प्रवेशद्वार असतात; त्या संधींचे आर्थिक लाभात रूपांतर करण्यासाठी उद्योगक्षमता आणि धोरणात्मक तयारी आवश्यक असते.
तंत्रज्ञानाचा वापर हा या परिवर्तनाचा आणखी एक निर्णायक घटक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, अचूक शेती, हवामानविषयक अंदाज, डिजिटल पुरवठा साखळी, स्वयंचलित प्रक्रिया यंत्रणा आणि माहिती विश्लेषण यांमुळे कृषी उत्पादनापासून ग्राहकांच्या मागणीपर्यंतच्या संपूर्ण व्यवस्थेत कार्यक्षमता वाढविणे शक्य आहे. कोणत्या प्रदेशात कोणत्या पिकाची मागणी वाढत आहे, कोणत्या वेळी उत्पादन बाजारात आणणे फायदेशीर ठरेल आणि कोणत्या प्रक्रियेतून अधिक मूल्य निर्माण होईल, याचे नियोजन माहितीच्या आधारे करता येऊ शकते.
तथापि, तंत्रज्ञानाचा लाभ मोठ्या उद्योगांपुरता मर्यादित राहिल्यास ग्रामीण विषमता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच डिजिटल सुविधा, प्रशिक्षण आणि सामूहिक पायाभूत सुविधांद्वारे लहान उत्पादकांनाही या नव्या अर्थव्यवस्थेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे. अन्नबाजारपेठेच्या वाढीचा विचार करताना पोषण आणि सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही.
प्रक्रिया केलेले सर्वच अन्नपदार्थ आरोग्यासाठी हानिकारक नसतात. योग्य पद्धतीने प्रक्रिया आणि साठवणूक केल्यास अन्नाची टिकवणक्षमता वाढते, पोषकतत्त्वांचे संरक्षण करता येते आणि दुर्गम भागांत अन्नपुरवठा सुलभ होतो; परंतु बाजारपेठेच्या विस्ताराच्या नावाखाली अतिसाखर, अतिरिक्त मीठ आणि अस्वास्थ्यकर चरबीयुक्त पदार्थांचा प्रसार वाढल्यास सार्वजनिक आरोग्यासमोर नवी आव्हाने उभी राहू शकतात.
भारताच्या अन्नअर्थव्यवस्थेसमोर (Food Economy) आज उत्पादनवाढीपेक्षा उत्पादनाचे मूल्य, बाजारपेठेच्या विस्तारापेक्षा त्या विस्तारातील समावेशकता आणि निर्यातीच्या आकड्यांपेक्षा जागतिक विश्वासार्हता ही अधिक महत्त्वाची आव्हाने आहेत. सहाशे अब्ज डॉलरची बाजारपेठ हे एक संभाव्य आर्थिक उद्दिष्ट आहे; ते साध्य झाले तरी भारतीय शेतीतील सर्व प्रश्न सुटतील, असे नाही.
शेतकर्यांचे उत्पन्न स्थिर आणि सन्मानजनक करणे, ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे, अन्नाची नासाडी कमी करणे, पोषणसुरक्षा बळकट करणे आणि पर्यावरणीय शाश्वतता जपणे या निकषांवरच या विकासाचे मूल्यमापन झाले पाहिजे.






