Jantar Mantar Protest : मोर्चातील हिंसाचार.! दिल्ली पोलिसांनी दाखल केले गुन्हे
हिंसाचार, दगडफेक, बेकायदा जमाव जमवणे, हिंसाचाराचा कट रचणे, संसद अधिवेशन सुरू असताना ड्रोन उडवणे आदी आरोपांशी संबंधित ते गुन्हे आहेत.

Jantar Mantar Protest : सीजेपीच्या मोर्चावेळी झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ४ गुन्हे दाखल केले. हिंसाचार, दगडफेक, बेकायदा जमाव जमवणे, हिंसाचाराचा कट रचणे, संसद अधिवेशन सुरू असताना ड्रोन उडवणे आदी आरोपांशी संबंधित ते गुन्हे आहेत.
हल्ला करणे, कायदा हातात घेणे आदी आरोपांवरून आणखी २ गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे समजते. हिंसाचारावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. तसेच, अनेक पोलीस वाहनांचे नुकसान केले, असा आरोप आहे.
मोर्चावेळी अशांतता निर्माण करण्याचे कारस्थान रचण्यात आले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. हिंसाचारात सामील असणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी पोलीस सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल फोन व्हिडीओ, ड्राेन व्हिज्युअलची छाननी करत आहेत.
राहुल, प्रियंका, अखिलेश यांची काही तासांनंतर सुटका !
पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या देणाऱ्या राहुल आणि प्रियंका गांधी यांच्या समवेत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना पोलिसांनी जबरदस्तीने हटवले. त्यांना ताब्यात घेऊन इतरत्र हलवण्यात आले.
राहुल यांना छत्रसाल स्टेडियमला, तर प्रियंका यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. प्रियंका यांच्या भेटीसाठी त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी पोलीस ठाण्यात पोहचल्या.
काही तासांनंतर पोलिसांनी सर्व नेत्यांची सुटका केली. त्याआधी ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न राहुल यांनी केला. त्यांनी जमिनीवर लोळण घेतली. त्यामुळे पोलिसांना त्यांना जोर लावून उचलावे लागले.
त्या गोंधळात राहुल यांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी राहुल आणि इतर नेत्यांची सुटका केल्याने अनेक तास रंगलेल्या अनपेक्षित घडामोडी रात्रीच्या सुमारास थंडावल्या.






