Passports cancelled : बोगस कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; ३१ पासपोर्ट रद्द
यामध्ये ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा परिसरातील सिमरियां गावाच्या पत्यावर बनवलेल्या १७ पारपत्रांचा समावेश आहे. उरलेली पारपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

Passports cancelled – मध्य प्रदेशात बोगस कागदपत्रांच्या आधारे भारतीय पारपत्र (पासपोर्ट) मिळवणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात विशेष कृती दलाने कारवाई तीव्र केली आहे. एसटीएफच्या तपास अहवालाच्या आधारे पारपत्र विभागाने ७० पैकी ३१ पारपत्रे तात्काळ रद्द केली आहेत.
यामध्ये ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा परिसरातील सिमरियां गावाच्या पत्यावर बनवलेल्या १७ पारपत्रांचा समावेश आहे. उरलेली पारपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात ६६ आरोपी अजूनही फरार असल्याची माहिती समोर आली आहे.
एसटीएफच्या तपासात उघड झाले आहे की, आरोपींनी स्वतःचे नाव आणि ओळख बदलून भारतीय नागरिक असल्याचे बनावट कागदपत्रे तयार केले आणि त्याद्वारे पारपत्र मिळवले. तपास यंत्रणांच्या मते, यातील बहुतांश आरोपी देशातून पसार होऊन परदेशात गेले आहेत.
या नेटवर्कने बांगलादेशी नागरिकांचे पारपत्र बौद्ध मठांच्या पत्यांवरून तयार करून घेतले होते. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार रियाल चौधरी उर्फ मित्यानंद भिक्षू आणि त्याच्या तीन बांगलादेशी साथीदारांना आधीच अटक करण्यात आली आहे.
याशिवाय स्थानिक पातळीवर मदत करणारे गुलाबराय गौतम, गयाप्रसाद गौतम आणि भोपाळ पासपोर्ट सेवा केंद्राचा एजंट नसीम अख्तर यांनाही गजाआड करण्यात आले आहे. चौकशीदरम्यान फरार आरोपी इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार आणि चीनसारख्या देशांमध्ये दडून बसल्याची माहिती मिळाली आहे.
मध्य प्रदेशव्यतिरिक्त महाराष्ट्रातील नागपूरमध्येही बनावट कागदपत्रांच्या आधारे पारपत्र बनवल्याचे प्रकरण समोर आले होते. एसटीएफ आता ग्वाल्हेर-डबरा आणि नागपूर येथील प्रकरणांमध्ये काही परस्परसंबंध आहे का, याचा शोध घेत आहे. उरलेली पारपत्रे लवकरच रद्द केली जातील.
रद्द केलेल्या पारपत्राचा वापर करण्याचा प्रयत्न झाल्यास इमिग्रेशन सिस्टीमद्वारे संबंधित व्यक्तीची ओळख पटवून तिला पकडले जाईल. नागपूरमध्ये समोर आलेल्या अशाच प्रकरणातील आरोपी आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती तेथील पोलिसांकडून मागवण्यात आली आहे असे एसटीएफचे डीआयजी राहुल लोढा यांनी सांगितले.






