Tuljapur Temple Donation : तुळजाभवानी मंदिर समितीकडून दुष्काळग्रस्तांसाठी ३ कोटींची मदत
धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे.

Tuljapur Temple Donation – राज्यासह धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे.
दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळावा आणि संकटाच्या काळात त्यांना आधार मिळावा, या उद्देशाने मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३ कोटी रुपयांचे योगदान देण्यात आले आहे, अशी माहिती मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ३ कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक माया माने यांच्यासह राहुल पाटील सास्तूरकर उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यात यंदा अत्यल्प पावसामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. अशा संकटाच्या काळात समाजातील विविध घटकांना मदतीचा आधार मिळावा, या भावनेतून तुळजाभवानी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तीन कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.






