Sunil Tatkare : राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत लवकरच दुरुस्ती होईल; सुनील तटकरेंनी केलं स्पष्ट
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रीय कार्यकारिणीबाबत (Sunil Tatkare) सोशल मीडियावर माहिती दिली आहे. याबाबत आमच्यात चर्चाही झाली असून कशा पद्धतीने वाटचाल करायची, याचा निर्णय झाला आहे.

Sunil Tatkare : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीच राष्ट्रीय कार्यकारिणीबाबत (Sunil Tatkare) सोशल मीडियावर माहिती दिली आहे. याबाबत आमच्यात चर्चाही झाली असून कशा पद्धतीने वाटचाल करायची, याचा निर्णय झाला आहे.
यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणीत येत्या काही दिवसांत दुरुस्तीचा निर्णय होईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्पष्टीकरण दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची नावे वगळल्याने ते नाराज असल्याचे सांगितले जात होते. मात्र, या सगळ्या गोष्टींवर आता सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
सुनील तटकरे (Sunil Tatkare) म्हणाले, निवडणूक आयोगाला लिहिण्यात आलेल्या पत्राबाबत सुनेत्रा पवार, प्रफुल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, पार्थ पवार अशी चर्चा झाली आहे. तो विषय पूर्णपणे संपुष्टात आला आहे. मी सगळे पत्र वाचले आहे. माझा ४२ वर्षांचा प्रवास आहे. सगळे वाचत-वाचत इथपर्यंत आलो आहे.
तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, संघटनेत अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, पाचवेळा आमदार, मंत्री राहिलोय, दोनदा खासदार म्हणून निवडून आलो. मागच्या मार्गाने नाही आलो. सगळे कागद वाचले आहेत. पुनर्पत्र पाठवण्यात येईल. कुठलाही समज गैरसमज पक्षात उरला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवारांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे शरद पवार यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतो. अशावेळेला राजकीय चर्चा झाली नाही. शरद पवारांकडे कुठलीही तक्रार केली नाही. तसेच पार्थ पवार, जय पवार हे अजित पवारांच्या निधनानंतर सक्रीय राजकारणात सहभागी झाले आहेत.
ते तरूण नेतृत्त्व आहेत. त्यांच्याबद्दल तक्रार असण्याचे कारण काय? उलट अजित पवारांच्या समवेत राजकीय प्रवास केल्यामुळे योग्यवेळी योग्य मार्गदर्शन, त्यांची आणि आमची भूमिका समजून घेऊन चर्चा करून आम्ही वाटचाल करत असतो, असे तटकरेंनी सांगितले.






