Sunil Tatkare : गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (एनसीपी) सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. सुनेत्रा पवार आणि पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा रंगली आहे. पक्षाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात काही वरिष्ठ नेत्यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख नसल्याचेही समोर आले होते. त्याचबरोबर दिल्लीतील पक्ष कार्यालयात काही नेत्यांना प्रवेश नाकारला जात असल्याच्या गंभीर आरोपांमुळे पक्षातील अस्वस्थता अधिक वाढली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षातील आरोप-प्रत्यारोपांवर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना कार्यालयात प्रवेश बंदी? अविनाश आदिक यांनी स्पष्ट केले की, “मी पक्षाचा राष्ट्रीय सचिव आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून मी दिल्लीत जातो आणि पक्ष कार्यालयातील कामकाज सांभाळतो. मात्र, गेले काही आठवडे मी दिल्लीला गेलो नव्हतो. काल मी पक्ष कार्यालयात गेलो होतो. Sunil Tatkare काल एका वृत्तपत्राने माझ्या नावाने बातमी दिली होती की, मी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रवेश बंद केला आहे. ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. माझ्या विरोधात काही लोकांनी ही अफवा पसरवली आहे.” आदिक यांनी पुढे म्हटले की, या बातमीबाबत संबंधित वृत्तपत्राविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार आहे. सुनील तटकरे प्रदेशाध्यक्षपदी कायम उमेश पाटील यांनी पक्षातील नेत्यांच्या पदांबाबत स्पष्टता दिली. ते म्हणाले, “एक वृत्तपत्रात पक्षासंदर्भात चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ते राहतील. प्रफुल्ल पटेल हे कार्याध्यक्ष आहेत आणि तेही कायम राहतील. पत्रकारांनी याची नोंद घ्यावी. पक्षाची राष्ट्रीय समिती नुकतीच जाहीर झाली आहे. पक्षात कोणतेही बदल करायचे असतील तर तो निर्णय राष्ट्रीय समितीच घेईल.” रोहित पवारांवर उमेश पाटील यांचे गंभीर आरोप पत्रकार परिषदेत आमदार रोहित पवार यांच्यावर सर्वात मोठे आणि गंभीर आरोप करण्यात आले. उमेश पाटील म्हणाले, “रोहित पवार हे अजित पवार यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अजित पवार यांचा सर्वाधिक छळ करण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला आहे. त्यांचा बारामतीवर डोळा आहे. बारामती ही अजित पवार यांची राजधानी आहे.” पाटील यांनी पुढे आरोप केला की, “अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीसंदर्भात रोहित पवार ढोल बडवून बोलत आहेत. ते अजित पवार यांची ‘लीगेसी’ खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या पक्षाची चिंता करू नये. तुमच्या पक्षातील सर्व आमदार आणि खासदार आमच्या पक्षात येण्यास तयार आहेत, पण आम्ही आतापर्यंत हा निर्णय घेतलेला नाही.”