Shevgaon News : शेवगाव तालुक्यात खरिपाच्या पेरण्या आटोपल्या, मात्र खरीप हंगाम धोक्यात; शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत
निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा शेवगाव तालुक्यातील खरीप हंगाम (Shevgaon News) मोठ्या संकटात सापडला आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरण्या उरकण्यावर भर दिला होता.

Shevgaon News : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा शेवगाव तालुक्यातील खरीप हंगाम (Shevgaon News) मोठ्या संकटात सापडला आहे. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरण्या उरकण्यावर भर दिला होता.
सुरुवातीच्या ओलाव्यावर अनेक भागात पेरण्या गतीने सुरू झाल्या, मात्र त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आधीच कमी पावसावर कशीबशी उगवून आलेली पिके आता पाऊस गायब झाल्याने कोमेजू लागली असून खरीप हंगाम हातचा जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
सध्या तालुक्यात पावसाचे पुनरागमन झाले असले तरी हा पाऊस पिकांसाठी पुरेसा नाही. सर्वत्र केवळ रिमझिम आणि बुरबुरी स्वरूपाचा पाऊस होत असल्याने जमिनीतील ओल वाढलेली नाही.
आकडेवारीचा विचार केला तर तालुक्यात जून महिन्यात केवळ ६९.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर जुलै महिन्यात ही परिस्थिती आणखी बिकट बनून आजअखेर अवघा २४.७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. म्हणजेच चालू हंगामात (Shevgaon News) तालुक्यात आतापर्यंत एकूण अवघा ९८.६ मिलीमीटर इतकाच अत्यंत तोकडा पाऊस झाला आहे.
या अत्यंत कमी पावसामुळे केवळ जिरायतीच नव्हे, तर बागायती भागातील विहिरी आणि बोअरवेलच्या पाणीपातळीतही कमालीची घट झाली आहे, ज्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी तालुक्यात वेळेवर आणि चांगला पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम उत्तम गेला होता, मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा शेवगाव तालुक्यात ६५ हजार ११० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी घाई केल्याने आतापर्यंत ४८ हजार २९३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या उरकल्या आहेत, तर उर्वरित २६ टक्के क्षेत्रावरील पेरण्या अद्याप खोळंबल्या आहेत.
कपाशी पिकाच्या संदर्भात शेवगाव तालुका संपूर्ण राज्यात आघाडीवर मानला जातो. येथे कापसाचे जिनिंग आणि प्रेसिंग कारखाने मोठ्या संख्येने उपलब्ध असल्याने स्थानिक बाजारात कपाशीला मोठी मागणी असते. याच कारणामुळे तालुक्यात दरवर्षी कापसाचा पेरा सर्वाधिक होतो.
यंदाही कृषी विभागाने कापसासाठी ३८ हजार ५०० हेक्टरचे उद्दिष्ट ठेवले होते, त्यापैकी तब्बल ३६ हजार १८८ हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड पूर्ण केली आहे. जर आगामी काळात दमदार पाऊस झाला, तर कापसाच्या क्षेत्रात आणखी (Shevgaon News) मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कापसाव्यतिरिक्त कृषी खात्याने केलेल्या पीकनिहाय नियोजनात बाजरीसाठी १६ हजार हेक्टरचे उद्दिष्ट होते, परंतु प्रत्यक्षात केवळ ९७० हेक्टरवर पेरणी झाली आहे. तूर पिकाचे १४ हजार ५०० हेक्टरचे उद्दिष्ट असताना ८ हजार ५४२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
सोयाबीनचे ३ हजार ८०० हेक्टरचे उद्दिष्ट असताना केवळ ८९३ हेक्टरवर, उडदाचे ४ हजार ३५० हेक्टरचे उद्दिष्ट असताना १ हजार ४७ हेक्टरवर, तर मुगाचे १ हजार ९५० हेक्टरचे उद्दिष्ट असताना फक्त ४२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
मका पिकाबाबत मात्र उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजेच २१० हेक्टरऐवजी २२८ हेक्टरवर पेरणी झाली असून कांदा पिकाच्या २०० हेक्टरच्या उद्दिष्टाची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. या मुख्य पिकांशिवाय तालुक्यात १ हजार ६६२ हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी नवीन उसाची लागवड केली असून, या सर्वच पिकांच्या अस्तित्वासाठी आता मोठ्या पावसाची गरज आहे.
सध्या शेतकऱ्यांसमोर पिके वाचवण्यासोबतच आणखी एक नवीन संकट उभे राहिले आहे. तालुक्यात अद्याप एकही मोठा किंवा धो-धो पाऊस झालेला नाही. जो काही पाऊस झाला आहे तो केवळ बुरबुरीच्या स्वरूपात झाल्याने शेतामध्ये मुख्य पिकांपेक्षा तणाची (गवत) वाढ अवाढव्य प्रमाणात झाली आहे.
पिकांची अंतर्गत मशागत, खुरपणी आणि कोळपणी करणे अत्यंत गरजेचे आहे; परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि येणाऱ्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांना शेतात काम करण्यास पुरेशी फुरसत किंवा वाफसा मिळत नाही, असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.
यामुळे शेतातील मशागतीचा खर्च वाढला असून, पिके तणाच्या विळख्यात सापडली आहेत. एकूणच या सर्व बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आता शेवगाव तालुक्यातील बळीराजा चातकासारखी दमदार पावसाची वाट पाहत आहे.






