Mumbai Rain : मुंबईत पावसाची हजेरी.! हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने काही भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा वाहण्याचा इशारा दिला आहे.

Mumbai Rain – राज्यात काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटसारख्या उकाड्याचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.
या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला आहे. भारतीय हवामान विभागाने काही भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा वाहण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईत शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. मुंबईत जुलैनंतर पावसाचे प्रमाण खूप कमी झाले होते.किरकोळ पाऊस वगळता मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नव्हता.
आकडेवारीनुसार, रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात मुंबईत सरासरी 52.07 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमध्ये अनुक्रमे 72.71 मिलीमीटर आणि 65.96 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान विभागाने वातावरण ढगाळ राहण्याचा आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. याशिवाय विजा चमकणे आणि 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात. मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला.
दादर, परळ आणि लालबाग भागात आज गणेशोत्सवासाठी खरेदी करण्यासाठी आलेल्या किंवा किंवा कोकणात जाण्यासाठी येणाऱ्या मुंबईकरांची मात्र यामुळे तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. वसई विरारमध्ये देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रस्ते जलमय झाल्याचे दिसले.





