Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांचा पाय आणखी खोलात.! भोंदू बाबा प्रकरणात ईडीची एन्ट्री, प्रकरणाला मिळाले नवे वळण
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना समन्स बजावले आहे.

Rupali Chakankar – भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना समन्स बजावले आहे. त्यांना याच आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.
दोन दिवसांपूर्वीच विशेष तपास पथकाने या प्रकरणात काही महत्त्वाच्या व्यक्तींची चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीच्या एन्ट्रीमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
अशोक खरात याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहार, कथित मनी लॉन्ड्रिंग, देणग्या आणि काही संशयास्पद मालमत्ता व्यवहारांची चौकशी ईडीकडून केली जात आहे.
या तपासादरम्यान काही आर्थिक व्यवहारांबाबत माहिती समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांना समन्स बजावण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. या एसआयटीकडून मागील काही दिवसांत अनेक व्यक्तींची चौकशी करण्यात आली असून काही आर्थिक कागदपत्रे आणि डिजिटल पुरावेही तपासासाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
एसआयटी चौकशी सुरू असतानाच ईडीने स्वतंत्रपणे मनी लॉन्ड्रिंग अँगलने तपास सुरू केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, ईडीच्या समन्सनंतर विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका सुरू केली आहे.






