voter: ‘त्या’ मतदारांना सुनावणीसाठी नोटिसा
voter:

मतदार याद्या पुनरीक्षण मोहीम; नाव, पत्त्यात दुरुस्तीबद्दल सुनावणी
voter: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत वगळलेल्या, तसेच नाव व पत्त्यात दुरुस्ती आवश्यक असलेल्या मतदारांना सुनावणीसाठी नोटिसा दिल्या जाणार आहेत. अशा मतदारांनी सुनावणीस उपस्थित राहताना मूळ कागदपत्रे सोबत आणावीत.
कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सहा समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही कागदपत्रे शंकास्पद आढळल्यास पडताळणीसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद, पासपोर्ट कार्यालय, तसेच राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठविली जाणार आहेत.
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर आलेल्या दावे व हरकतींवर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत सुनावणी घेण्यात येणार आहे.
सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना मतदान केंद्रांचे विभाग वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी एका मतदान केंद्रावर सुनावणीची व्यवस्था करावी. एका सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे १० गावे असल्यास संबंधित गावांच्या मतदारांना सोयीच्या ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक दिवस याप्रमाणे सुनावणीची तारीख, ठिकाण व वेळ निश्चित करावी.
मंडल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सुनावणी आयोजित करावयाची असल्यास ते ठिकाण मतदाराच्या पत्त्यापासून दोन किलोमीटरच्या अंतरावर असेल, याची दक्षता घेतली जाणार आहे.
नवमतदारांना संधी
नावे वगळण्यात येणाऱ्या यादीत काही मतदारांची नावे असल्यास व ज्यांच्याकडे २००२ च्या मतदार यादीचा पुरावा असेल, अशा मतदारांनी एक सप्टेंबरनंतर अर्ज क्रमांक सहा भरून नव्याने मतदार यादीत समावेश करता येणार आहे. ज्या नवमतदारांना यादीमध्ये समावेश हवा असेल, अशांनी जन्म दिनांक व ठिकाणाचा पुरावा द्यावा लागणार आहे. यासाठी शाळा सोडल्याचा, तसेच अधिवासाचा दाखलाही पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली.





