Stray Dogs Pune : शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, पण महापालिका फक्त ‘या’ कुत्र्यांनाच पकडणार; काय आहे कारण?
Stray Dogs Pune : भटक्या कुत्र्यांच्या तक्रारींनंतर पुणे महापालिकेचे स्पष्टीकरण; केवळ आजारी आणि पिसाळलेल्या श्वानांवरच नियमांनुसार कारवाई होणार.

Stray Dogs Pune – केवळ आजारी, जखमी किंवा पिसाळलेले श्वान ओळखूनच त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. निरोगी श्वानांना मारले जाणार नाही, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले असून, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येबाबत नागरिकांच्या तक्रारीनंतर पुणे महापालिकेने भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या २०२३ च्या नियमांनुसार आम्ही काम करत आहोत.
रेबीजची लक्षणे दिसणारे, अत्यंत आजारी किंवा लोकांसाठी थेट धोका असणारे श्वानच पकडले जातील. त्यांची पशुवैद्यकीय तपासणी करूनच पुढील निर्णय घेतला जातो, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सारिका भोसले- फुंडे यांनी दिली आहे. आपल्या आजूबाजूला वेगळे लक्षण असलेले श्वान आढळल्यास त्याची माहिती देण्याविषयीचे नागरिकांना आवाहन आणि जनजागृती आम्ही करत आहोत. असे श्वान आढळल्यास प्रशिक्षित पथक आणि पशुवैद्य श्वानाचे वर्तन तपासतात.
लाळ गळणे, आक्रमकता, पाणी न पिणे ही रेबीजची लक्षणे आहेत. संशयित श्वानाला १० दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाते. रेबीजची पुष्टी झाल्यास आणि उपचार शक्य नसल्यासच त्याला प्रक्रियेनुसार मारले जाते. मात्र, त्याला अन्य आजार असल्यास अशांवर उपचार केले जातात. श्वान बरा झाल्यानंतरच त्याला सोडले जाते. मात्र, त्याआधी त्याचे निर्बीजीकरण आणि लसीकरण केले जाते.
रेबीजच्या केसेस घटल्या
पीएमसीच्या आकडेवारीनुसार जनजागृती आणि लसीकरणामुळे शहरात रेबीजच्या केसेस कमी झाल्या आहेत. रेबीज १००% टाळता येणारा आजार आहे. श्वान चावल्यास तातडीने सरकारी दवाखान्यात मोफत अँटी-रेबीज लस घ्या, असे आवाहन केले जाते. २०२४ मध्ये भटक्या श्वानांमध्ये १५ रेबीज केस होत्या, त्या २०२५ मध्ये तीनवर आल्या. २०२६ मध्ये एप्रिलपर्यंत फक्त दोन केस सापडल्या आहेत. संशयित प्रकरणे २०२४ मध्ये ५३ होती, ती २०२६ मध्ये शून्यावर आली आहेत. संशयित पिसाळलेल्या श्वानांची माहिती पीएमसी हेल्पलाइन १८००-१०३-०२२२ वर द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.





