Pune : शाळेच्या कंपाउंडलगत कचऱ्याचे ढिगारे; ‘दैनिक प्रभात’च्या वृत्तानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये!
Pune : शिवणे परिसरातील शाळेच्या कंपाउंडलगत साचलेला कचरा महापालिकेने हटविला. ‘क्रोनिक स्पॉट’ बंद करण्याची मोहीम सुरू असून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Pune : शिवणे परिसरातील महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील शाळेच्या कंपाउंडलगत मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याचे वृत्त ‘दैनिक प्रभात’ने प्रसिद्ध केले होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाकडे तातडीने कचरा हटविण्याची मागणी करण्यात आली. त्याची दखल घेत प्रशासनाने शाळेच्या कंपाउंडलगतचा संपूर्ण कचरा हटविला आहे.
दरम्यान, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार यांच्या आदेशानुसार परिसरातील कचरा साचण्याचे ‘क्रोनिक स्पॉट’ बंद करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
आरोग्य निरीक्षक रविराज बेंद्रे यांच्या नेतृत्वाखाली सिद्धिविनायक ग्रुपचे असिस्टंट मॅनेजर पवन फडतरे आणि सुपरवायझर अभिषेक कांबळे यांच्या पथकाकडून कोंढवे-धावडे, भीमनगर आणि उत्तमनगर परिसरातील कचरा टाकण्याची ठिकाणे बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.
या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, जनजागृतीसोबतच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. तसेच स्वच्छ संस्थेसोबत कचरा वेचक जोडण्याचे कामही सुरू आहे.
या मोहिमेत स्थानिक नगरसेवक सुभाषभाऊ नाणेकर आणि नगरसेविका अनिताताई इंगळे यांचा सक्रिय सहभाग आहे.
आरोग्य निरीक्षक रविराज बेंद्रे म्हणाले, “नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. कचरा संकलनाची व्यवस्था असलेल्या ठिकाणीच कचरा द्यावा. परिसर कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेकडून जनजागृती आणि कारवाई सुरू आहे. नागरिकांनी तसेच सोसायट्यांमधील रहिवाशांनी या मोहिमेला सहकार्य करावे.”
‘दैनिक प्रभात’च्या वृत्तानंतर शाळेच्या परिसरातील कचरा हटविण्यात आल्याने पालिका प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत होत आहे. मात्र, कचरा हटविण्यासोबतच पुन्हा त्याच ठिकाणी कचरा साचणार नाही, यासाठी नागरिकांनीही जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे.





