Pune Street Food : खाऊगल्ली आता रात्री दहाला बंद! सार्वजनिक शांतता, सुव्यवस्थेसाठी पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय
Pune Street Food : मध्यरात्रीनंतर खाऊगल्ल्यांमध्ये होणाऱ्या अनियंत्रित गर्दीला पुणे पोलिसांचा चाप; कायदा, सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांततेसाठी आयुक्तांचे आदेश.

Pune Street Food : शहरातील पदपथ, रस्त्यावरील हातगाड्या, स्टॉल, ठेले आणि पानटपऱ्या यांना रात्री दहा वाजेपर्यंतच व्यवसाय करण्याची परवानगी असताना अनेक ठिकाणी खाऊगल्ल्या मध्यरात्रीनंतरही सुरू राहत असल्याचे निदर्शनास आल्याने पुणे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील सर्व खाऊगल्ल्या रात्री दहाच्या ठोक्याला बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सोमवारी दिली.
मागील आठवड्यात पोलीस आयुक्तांनी रात्रीच्या वेळी शहरातील विविध भागांना सलग दोन दिवस भेट देत कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता. यावेळी अनेक खाऊगल्ल्या रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे, तसेच तेथे अनियंत्रित गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे सार्वजनिक शांतता आणि वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे पोलिसांचे मत आहे. पोलीस आयुक्तांनी त्यानंतर सर्व पोलीस ठाण्यांना खाऊगल्ल्या रात्री दहाला बंद करण्याचे आदेश दिले.
मात्र काही ठिकाणी या कारवाईदरम्यान हॉटेल, दुकाने आणि इतर व्यावसायिक आस्थापनांनाही दहाच्या ठोक्याला व्यवसाय बंद करण्यास भाग पाडण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या. गेल्या चार-पाच दिवसांपासून शहरातील अनेक भागांत हा प्रकार सुरू असल्याने नागरिक आणि व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली होती. हॉटेल व्यावसायिकांच्या शिष्टमंडळानेही पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले होते.
परवानाधारक आस्थापना सुरू राहणार
याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, परवानाधारक आस्थापनांना बंद करण्याचा उद्देश नाही. संबंधित कायद्यातील परवानगीनुसार हॉटेल, रेस्टॉरंट, पब आणि बार सुरू राहतील. पदपथावर किंवा दुकानाबाहेर टेबल-खुर्च्या टाकून होणारा व्यवसाय बंद करण्यात येईल. नियमानुसार आस्थापनांनी दुकानाच्या आतच व्यवसाय करणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





