Pune River Pollution : नदीकाठची ८० गावे दूषित पाण्याच्या विळख्यात! दोन्ही महापालिकांच्या सांडपाण्याचा परिणाम..धक्कादायक वास्तव समोर
Pune River Pollution : नदीपात्रात कचऱ्याचे खच आणि केमिकल मिश्रित पाणी; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिशीनंतरही दोन्ही महापालिका आणि पीएमआरडीएचा ढिसाळ कारभार उघड.

Pune River Pollution – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे मुळा-मुठा आणि भीमा नदीकाठची तब्बल ७० ते ८० गावे दूषित पाण्याच्या विळख्यात सापडली आहेत. या प्रदूषित पाण्यामुळे परिसरातील विहिरी व पाण्याचे स्रोत खराब झाले असून, ग्रामीण भागातील नागरिकांना कॅन्सर, किडनी स्टोन आणि त्वचाविकारांसारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही यामुळे बिकट बनला आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत, संबंधित महापालिकांनी निधी देऊन या गावांमध्ये तातडीने पाणी शुद्धीकरण प्रकल्प राबवावेत, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. नदीकाठचे जुने शुद्धीकरण प्रकल्प सध्या बंद असल्याने ग्रामस्थांना नाईलाजाने हेच दूषित पाणी वापरावे लागत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी दोन्ही महापालिकांना नोटिसा बजावल्या आहेत.
या समस्येची गांभीर्याने नोंद घेत पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांडपाणी प्रदूषण रोखण्यासाठी आणि उपाययोजनांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. घरगुती आणि औद्योगिक सांडपाणी, मैला येत असल्यामुळे ही नदी प्रदूषित झाली आहे. नदीचे पात्र स्वच्छ करणे व शुद्धीकरण करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, नदी काठावरील मुख्य ठिकाणी नदीकाठ विकसित करणे,
जलप्रदूषण होत असलेल्या ठिकाणे निश्चित करून त्यावर उपयोजना करणे. त्यासाठी दोन्ही महापालिका मिळून आणि पीएमआरडीएने जलशुद्धीकरणाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. मात्र, त्यात फारसी प्रगती दिसून येत नाही. त्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसत आहे.
अशी आहे नदीची अवस्था
– नदीच्या पाण्यात थेट नाल्यांतून प्रदूषित पाणी येते
– नदीतील गाळाची पातळी सातत्याने वाढत आहे
– नदीपात्रात कचऱ्याचे खच
– नदीच्या पाण्यातील मासे मृत होण्याचे प्रकार वारंवार झाले आहेत.
– औद्योगिक वसाहतीतून केमिकल मिश्रित पाणी नदीत सोडले जाते.
– नदी काठच्या गावातील सांडपाणी येऊन मिसळते.





