Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकाचा कायापालट! आता ६ नाही तर १२ फलाट; ४४ कोटींच्या कामाला सुरुवात
Pune Railway Station : पुणे स्थानकावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त सहा प्लॅटफॉर्म उभारणार; पहिल्या टप्प्यात ६०० मीटर लांबीच्या दोन फलाटांचे काम प्रगतीपथावर.

Pune Railway Station – रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची दिवसेंदिवस वाढणारी गर्दी आणि गाड्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने स्थानक विस्तारीकरणाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे स्थानकात आता नवीन सहा प्लॅटफॉर्म (फलाट) उभारण्यात येणार असून, या कामाला प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर गाड्यांचा ओघ वाढल्याने अनेकदा गाड्यांना मुख्य ट्रॅकवरून बाजूला थांबून राहावे लागते, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यात भेट देऊन रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर नवीन सहा फलाट वाढवण्याचे आदेश दिले. त्यानुसार आराखडा तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार पुणे रेल्वे विभागाच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. सध्या या स्थानकावर सहा प्लॅटफॉर्म कार्यरत आहेत. आता अतिरिक्त सहा नवीन प्लॅटफॉर्मची तयार करण्याचे नियोजन केले आहे.
विशेष म्हणजे हे नवीन फलाट आयलँड स्वरूपाचे असणार आहेत. त्यामुळे एकाच फलाटाच्या दोन्ही बाजूंना गाड्या उभ्या राहू शकतात. ज्यामुळे कमी जागेत अधिक गाड्यांचे संचलन करणे सोपे होईल. या विस्तारीकरणामुळे भविष्यात नवीन गाड्या सुरू करण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. रेल्वेच्या या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत होत आहे.
तीन टप्प्यांत काम
या प्रकल्पासाठी रेल्वे प्रशासनाने ४४.०९ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या निधीतून प्लॅटफॉर्मचे बांधकाम, ट्रॅक टाकणे आणि प्रवाशांसाठी आवश्यक सोयीसुविधा विकसित केल्या जातील. पहिल्या टप्प्यात ११ आणि १२ क्रमांकाचे फलाट (लांबी ६०० मीटर) उभारणीचे काम सुरू झाले. दुसरा टप्प्यात प्लॅटफॉर्म नऊ आणि १० (लांबी ७५० मीटर), तर तिसऱ्या टप्यात प्लॅटफॉर्म सात आणि आठचे (लांबी ६५० मीटर) काम सुरू होईल.
“पुणे रेल्वे स्थानकावरील विस्तारीकरणाच्या कामाला सुरवात झाली असून, येत्या वर्षभरात हे काम पूर्ण होईल. त्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त सहा फ्लॅटफाॅर्म, तसेच अन्य सोयीसुविधा उपलब्ध होणार आहे. भविष्यात गाड्यांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे.”
– हेमंकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग






