Pune Politics : भाजप- राष्ट्रवादीत लेटर वाॅर सुरूच; राष्ट्रवादीचे आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
Pune Politics : महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आता अधिकच तीव्र झाला असून, दोन्ही पक्षांमध्ये ‘लेटर वाॅर’ सुरू झाले आहे.

Pune Politics : महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संघर्ष आता अधिकच तीव्र झाला असून, दोन्ही पक्षांमध्ये ‘लेटर वाॅर’ सुरू झाले आहे.
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा निधी शून्य करण्याचा निर्णय स्थायी समितीत झाल्यानंतर भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांनी महापालिकेत मित्रपक्षाकडून होत असलेल्या ‘अन्यायकारक वागणुकी’बाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. टिंगरे यांनी पत्रात महायुतीच्या धर्माची आठवण करून देत महापालिकेतील भाजपच्या भूमिकेवर थेट नाराजी व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांचा निधी शून्य करण्याचा निर्णय हा केवळ व्यक्तीगत राजकीय मतभेदांचा परिणाम नसून त्याचा फटका संबंधित नगरसेवकांच्या मतदारसंघातील नागरिकांना बसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आगामी काळात राष्ट्रवादीच्या अन्य नगरसेवकांच्या निधीबाबतही अशीच भूमिका घेतली जाणार असल्याची चर्चा असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
महापौर आणि उपमहापौर निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने भाजपला सहकार्य केले. त्यावेळी गणेश बिडकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना निधी तसेच विविध विषय समित्यांमध्ये योग्य प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर स्थायी समितीच्या अंदाजपत्रकातील निधीवाटपात राष्ट्रवादीला अपेक्षित न्याय मिळाला नाही.
क्षेत्रीय कार्यालयांची रचना करताना राष्ट्रवादीला एकाही प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळू नये, अशा पद्धतीने रचना करण्यात आल्याची भावना पक्षात असल्याची भावन व्यक्त करत नगरसेवकांच्या कामावर आणि नागरिकांच्या विकासकामांवर थेट परिणाम होत असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
तुम्हीच महापालिकेत लक्ष घालावे..
या पत्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यापूर्वीच ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर महापालिका आयुक्तांना आवश्यक सूचना देण्यात आल्या; मात्र अद्याप प्रश्न सुटलेला नाही, असे टिंगरे यांनी स्पष्ट केले आहे.
‘भारत मंडपम’च्या प्रस्तावासह विकासाच्या मुद्द्यांवर राष्ट्रवादीने महायुतीला सहकार्य केले आहे. त्यामुळे आमची भूमिका व्यक्ती किंवा पक्षविरोधाची नसून विकासाच्या मुद्द्यावर सहकार्याची आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना समान आणि न्याय्य संधी देण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.





