Pune News : गुरू-शिष्यांच्या स्नेहमेळाव्यात उजळल्या शाळेच्या आठवणी !
प्रभात रोड येथील टुलिप्स सोसायटीत पार पडलेल्या या स्नेहमेळाव्यात गुरु-शिष्य नात्याचा भावनिक आविष्कार अनुभवायला मिळाला.

Pune News : मुंबईतील जनता हायस्कूल, वरळीच्या माजी विद्यार्थ्यांनी पुण्यात एकत्र येत आपल्या वर्गशिक्षिका शैला नाडकर्णी यांच्या सहवासात शालेय जीवनाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रभात रोड येथील टुलिप्स सोसायटीत पार पडलेल्या या स्नेहमेळाव्यात गुरु-शिष्य नात्याचा भावनिक आविष्कार अनुभवायला मिळाला.
जनता हायस्कूल, वरळी (मुंबई) येथे १९७० ते २००२ या कालावधीत अध्यापन करणाऱ्या ज्येष्ठ शिक्षिका शैला नाडकर्णी यांनी आपल्या कार्यकाळात असंख्य विद्यार्थ्यांना घडवले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत असून, त्यांनी आपल्या शिक्षिकेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा विशेष स्नेहमेळावा आयोजित केला होता.
प्रभात रोड येथील टुलिप्स सोसायटीत झालेल्या या कार्यक्रमात शाळेतील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी जुन्या प्रसंगांना उजाळा दिला. शैक्षणिक शिस्त, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य दिशा देण्याची त्यांची हातोटी याबद्दल उपस्थितांनी भावना व्यक्त केल्या.
यावेळी चित्रपट दिग्दर्शक मुकेश राणे, पत्रकार, व्याख्याते युवराज भगत, अकाउंटंट नयना झिटे, अक्षदा परब, नम्रता चौगुले, सुजाता शिर्के, हर्षदा भोईर, शिक्षिका सारिका पारखी, अकाउंट मॅनेजर प्रिया मोटे, सपना आगलावे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी शैला नाडकर्णी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला.
या स्नेहमेळाव्यामुळे अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांना जुन्या मैत्रीचा धागा पुन्हा अनुभवता आला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नात्याची ऊब जपणारा हा सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.





