Pune : उष्णतेच्या लाटेत 6 तास वीजपुरवठा खंडित राहणार; सिंहगड रस्ता परिसराला बसणार फटका
Pune

Pune : राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून पुण्यातही तापमानाचा पारा ४२ अंशांच्या घरात पोहोचला आहे. अशा परिस्थितीत नागरिक आधीच उकाड्याने हैराण झाले असताना महावितरणकडून दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवार (दि. १४) रोजी सिंहगड रस्ता परिसरातील अनेक भागांमध्ये तब्बल सहा तास वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार असून महावितरणच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महापारेषण कंपनीकडून या भागातील वेगवेगळी उपकेंद्र दुरूस्तीसाठी बंद ठेवली जाणार आहेत. नांदेड सिटी येथे दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत हा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विशेषतः नांदेड सिटी आणि नांदेड सिटी टाऊनशिपमधील नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे.
या परिसराला फटका
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, नांदेड सिटी टाऊनशिप परिसर प्रभावित होणार आहे. वारजे टॉवर वर्क्स, राठी बेहरे परिसर, भुजबळ टाऊनशिप, इंद्रायणी कॉलनी, हॅपी कॉलनी, खराडे पाटील सोसायटी, आनंदनगर, आरएमडी कॉलेज व स्कूल परिसर, श्रीराम सोसायटी आणि वसुधा इश्वरा या भागांतील वीजपुरवठा बंद राहणार आहे. उत्तमनगर, दांगट पाटील नगर, शिंदे पार्क, कोंढवे धावडे, रामनगर, गणपती माथा, अहिरे गाव, देशमुखवाडी आणि शिवणे परिसर प्रभावित होणार आहे. खडकवासला गाव, किरकटवाडी, कोळेवाडी, धायरी गाव, जे. पी. नगर, शिवणे गाव, धोंडे कॉर्नर तसेच आराचटी परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. दामाडी एरिया, आगम मंदिर परिसर, साई मायस्टिकव्ह्यू, के. बी. डेव्हलपर्स, अमित ब्लॉसमफिल्ड सोसायटी, आंबेगाव, जांभुळवाडी रोड, दल्लेनगर, सनब्राईट स्कूल परिसर, लिपाणे वस्ती, जांभुळवाडी तलाव, अथेन्सिया रॉयल सोसायटी आणि तक्षशिला सोसायटी या भागांनाही वीजबंदीचा फटका बसणार आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात उकाडयाने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना घरात कूलर, पंखे, एसी आणि पाण्याच्या मोटारींवर अवलंबून राहावे लागत आहे. अशा वेळी सकाळपासून दुपारपर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आधीच प्रचंड उकाडा असताना नागरिकांना अशा प्रकारे वेठीस धरणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.





