Pune Metro : गणेशोत्सवात पुणे मेट्रोचा मोठा बदल! गर्दीच्या वेळी दर 5 मिनिटांनी मेट्रो; ‘या’ स्थानकाबाबत महत्त्वाचा निर्णय
Pune Metro : गणेशोत्सवात पुणे मेट्रोची सेवा वाढणार असून गर्दीच्या वेळेत दर ५ मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मंडई स्थानक एकदिशात्मक राहणार असून विसर्जनासाठी ४१ तास अखंड सेवा मिळणार.

Pune Metro : गणेशोत्सवात शहरात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेत पुणे मेट्रोने प्रवाशांसाठी वेळापत्रक, स्थानक व्यवस्थापनात बदल केले आहेत. १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान म्हणजेच गणपती बाप्पाच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार असून गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो उपलब्ध होणार आहे.
गणेशोत्सवात गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि मध्यवर्ती भागात गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मार्गिका क्रमांक १ च्या (पिंपरी चिंचवड ते स्वारगेच) कसबा पेठ स्थानकाचा वापर करावा.
पेठ भागात जाण्यासाठी मार्गिका २ (रामवाडी ते वनाझ) वापर करणाऱ्यांनी वनाजच्या बाजूने येताना डेक्कन जिमखाना स्थानकावर उतरावे, रामवाडीच्या बाजूने येणाऱ्या भाविकांनी पुणे पालिका मेट्रो स्थानकाचा वापर करावा. महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकात उतरून गर्दी करणे टाळावे. हे स्थानक मुख्यत्वे परतीच्या प्रवासासाठी वापरावे असे, आवाहन मेट्रोने केले आहे.
तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानक हे गणेशोत्सव काळात १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या काळात युनिडायरेक्शनल (एकदिशात्मक) स्वरूपात कार्य करेल. त्यानुसार, या स्थानकाचे लोकमान्य टिळक पुतळा येथील द्वार क्रमांक ३ हे फक्त प्रवाशांना स्थानकात प्रवेश करण्यासाठी खुले असेल. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील द्वार क्रमांक २ हे प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी उपलब्ध असेल.
तसेच भाविकांनी जिल्हा न्यायालय स्थानकावर इंटरचेंज मार्गिका बदलणे टाळून कसबा पेठ, पालिका, छत्रपती संभाजी उद्यान स्थानकांचा वापर करावा, असेही मेट्रोने म्हटले आहे.
विसर्जनाला ४१ तास अखंड सेवा –
गणेश चतुर्थी ते १६ सप्टेंबरदरम्यान मेट्रोची नियमित सेवा सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू असेल. १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान विशेष वेळापत्रकानुसार सेवा सकाळी ६ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर २५ सप्टेंबर सकाळी ६ वाजल्यापासून २६ सप्टेंबर रात्री ११ वाजेपर्यंत तब्बल ४१ तास सेवा अखंडित सुरू ठेवण्यात येणार आहे. २७ सप्टेंबरपासून सेवा पुन्हा सकाळी ६ ते रात्री ११ या नियमित वेळेत सुरू राहिल.





