pune: २१ धोकादायक वाड्यांवरील कारवाई रखडलेलीच!
pune:

पाच वर्षांत ५२ पडझडीच्या घटना; १४ जखमी
– ३०५ अतिधोकादायक वाड्यांपैकी २८४ उतरविले
pune: ऐतिहासिक वाड्यांचा वारसा जपणार्या मध्यवर्ती पेठांमध्ये याच वाड्यांनी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणात ३०५ वाडे अतिधोकादायक (सी-१) आढळले. त्यापैकी २८४ वाडे उतरवले आहेत; परंतु २१ वाड्यांवर अद्याप कारवाई झाली नाही.
रहिवाशांचा विरोध असल्याचे कारण देत महापालिकेने संबंधित पोलीस ठाण्यांना कळवून जाहीर निवेदने प्रसिद्ध केली आहेत. त्यामुळे आता पुढील कारवाई कधी होणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. याबाबत नगरसेविका पल्लवी जावळे यांनी प्रशासनाला लेखी प्रश्न विचारला. त्याला प्रशासनाने दिलेल्या उत्तरातून यासंबंधी माहिती समोर आली आहे.
शहर अभियंता कार्यालयाच्या माहितीनुसार २०२२-२३ मध्ये १४० अतिधोकादायक वाडे आढळले आणि सर्व १४० उतरविण्यात आले. २०२३-२४ व २०२४-२५ मध्ये १६५ वाडे निश्चित झाले. त्यापैकी १४४ वाड्यांवर कारवाई झाली असून, २१ वाडे अद्याप प्रलंबित आहेत.
अग्निशमन विभागाच्या आकडेवारीनुसार २०२१ ते जुलै २०२६ दरम्यान वाडे, घरे अथवा भिंती पडण्याच्या ५२ घटना घडल्या. २०२१ मध्ये चार, २०२२ मध्ये आठ, २०२३ मध्ये दहा, २०२४ मध्ये सात, २०२५ मध्ये १३, तर २०२६ मध्ये जुलैअखेर दहा घटना घडल्या. या घटनांमध्ये १४ नागरिक जखमी झाले.
या दुर्घटनांमध्ये झालेल्या आर्थिक नुकसानीची नोंद महापालिकेकडे नसल्याचेही प्रशासनाच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे. प्रत्येक वर्षाच्या आकडेवारीत वित्तहानीबाबत माहिती समजू शकली नाही, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दुर्घटनेनंतर मालमत्तेचे आणि नागरिकांच्या आर्थिक नुकसानीचे मूल्यांकन करण्यात आले नाही.
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक वाड्यांची पाहणी आणि नोटीस देण्याला सुरुवात होते. असे असताना ते २१ अतिधोकादायक वाड्यांबाबत अद्याप कार्यवाही झाली नसल्याने एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट प्रशासन पाहात आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.





